हिंगणघाट,
dr-hedgewars-play : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व संस्कार भारती हिंगणघाट यांच्या संयुत वतीने १८ एप्रिल रोजी श्रीमती सि. मो. विद्यालय कारंजा चौक येथे सायंकाळी ७ वाजता नादब्रम्ह निर्मित ‘युगप्रवर्तक - डॉ हेडगेवार’ या द्विअंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना शताब्दी वर्षनिमित्ताने पद्माकर धानोरकर यांनी नादब्रह्म नागपूर या संस्थेद्वारे नाटकाची निर्मिती केली आहे. डॉ. अजय प्रधान लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन नागपूरचे ज्येष्ठ कलावंत सुबोध सुर्जीकर यांचे असून संगीत संगीतकार शैलेश दाणी यांचे आहे.
या नाटकाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, नगर संघचालक विनोद नांदुरकर यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या राष्ट्रकार्याची प्रेरक गाथा, संघ स्थापनेमागील विचारशती आणि त्यागमय जीवनयात्रा या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. राष्ट्रप्रेम, शिस्त, संघटनशती आणि मूल्याधिष्ठित जीवन या तत्त्वांना समर्पित हे नाटक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
या नाटकाचा प्रयोग नि:शुल्क असून हिंगणघाट शहर व आजूबाजूच्या गावांमधील अधिकाधिक रसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी तसेच संस्कार भारती हिंगणघाट तर्फे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सचिव रमेश धारकर, संस्कार भारतीचे वतीने संजय देशपांडे, कार्यक्रमाचे संयोजक किशोर चवरे, मुख्याध्यापक राजू कारवटकर, मनीषा कोंडावार यांनी केले आहे.