सिंदीरेल्वे,
encroachment-removal-action : अतिक्रमणाने बजबजलेल्या या ’पोलासिटी’त जवळपास २५ वर्षानंतर नगरपालिकेला जाग आली आणि पालिकेने १८ मार्चला शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला. दुसर्या दिवशी शासकीय सुट्टी आल्याने कारवाई थांबविली. परंतु, आता एक महिना झाला ती कारवाई काही होताना दिसत नाही. माशी नेमकी कुठे शिंकली असा प्रश्न मुख्याधिकारी गावीत यांना विचारल्या जात आहे.
एक दिवसाच्या कारवाईत ज्या दुकानांची तोडफोड झाली ते शहरातील नागरिकच होते आणि ही कारवाई करण्यापूर्वी त्या मालमत्ताधारकांना साधी नोटीस देण्याचे सौजन्य बाळगले नाही, असा आरोप होत आहे. नगर पालिकेला आमचेच प्रतिष्ठान अतिक्रमणास कारणीभूत असल्याचे का जाणवले? असा प्रश्न त्या कुटुंबाने विचारला आहे. अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते अरुंद झाले, ते बाजार चौकात जाताना कुणाच्याही लक्षात येते. प्रमुख मार्गाच्या दोन्ही बाजूला दुकानं असून दुकानदार रस्त्यावर साहित्य ठेवतात. त्यांच्या विरुद्ध प्रशासन बोलत नाही. कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. ग्राहकांचे वाहन रस्त्यावरच उभे ठेवल्या जाते, त्याचे काय? असा सवाल अन्यायग्रस्तांचा आहे.
त्यामुळे केवळ अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली भेदभाव करणे योग्य नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गुरुवारी आठवडी बाजारात येणार्या ग्राहकांसह महिलाांना होणारा त्रास आपला अनुभवला काय असा सवाल अनेक महिलांसह माजी नगराध्यक्ष डॉ. शालिनी मुडे यांनी उपस्थित केला आहे.
हा आठवडी बाजार कोरोना काळात शाळेच्या पटांगणात भरविला जात होता. तो परत तेथेच न्यावा, अशी जनतेची मागणी आहे. अतिक्रमण हटवा. पण, जनतेला समज किंवा सूचना द्यावी नंतर बुलडोझर चालवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.
शहरातून जाणार्या महामार्ग ३५३ (आय) वरील वाहतूक कोंडीकडे लक्ष पुरविणे अगत्याचे आहे. ज्या अतिक्रमणाबाबत एनएचआयकडे पत्रव्यवहार केला त्याचे काय झाले असा प्रश्न व्यावसायिक लक्ष्मण बोरकर यांनी उपस्थित केला आहे.