वणी-वरोरा मार्गावर भीषण अपघात

दोघांचा मृत्यू : दोघे गंभीर

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
accident-on-wani-warora-road : वणी-वरोरा राज्यमार्गावर बुधवारी दुपारी पाटाळा पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोनजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ आहे. तालुक्यातील वांजरी येथील बांधकाम कामगार प्रदीप रमेश ठमके (वय 31) हे आपल्या दुचाकीने सहकारी अनिल बाबाराव कुत्तरमारे (वय 40, मानकी) यांच्यासह शेंबळ गावाकडे जात होते. दुपारी 12.15 च्या सुमारास पाटाळा पुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणाèया एका स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
 
 
acc
 
 
 
धडक इतकी भीषण होती की अनिल कुत्तरमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रदीप ठमके गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याखाली जाऊन 3 ते 4 पलट्या घेत शेतात कोसळली. जखमी प्रदीप ठमके यांना तातडीने वरोरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनिल कुत्तरमारे यांच्यामागे आई, पत्नी, दोन लहान मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
 
 
कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर वरोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जखमी मारेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे वणी व वरोरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी वणी पोलिस अधिक तपास करत असून कारमधील प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.