गोंदिया
Railway police rescue Gondia मुंबई येथून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा गोंदिया लोहमार्ग पोलिसांनी शोध घेत यशस्वीपणे रेस्क्यू केले आहे. सदर मुलगा ट्रेनमधून एकटाच प्रवास करीत असताना गोंदिया रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला.
Railway police rescue Gondia रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी मुंबई येथील दादाभाई नौरोजी नगर पोलिस ठाणे येथे फिर्यादी मारोफा हर्षद शेख (३४, रा. अंधेरी, मुंबई) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या १४ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने आमिष देऊन पळवून नेल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास डी. एन. नगर पोलिस ठाणे व मुंबई क्राइम ब्रँच युनिट ९ करीत होते. तपासादरम्यान मुलगा मुंबईहून हावड्याकडे जाणार्या ट्रेनमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. Railway police rescue Gondia पोलिस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर यांच्या आदेशानुसार संपूर्ण रेल्वे मार्गावर शोधमोहीम राबविण्यात आली. त्याअनुषंगाने गोंदिया लोहमार्ग पोलिसांनी येणार्या सर्व गाड्यांची तपासणी सुरू केली. १३ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आलेल्या मुंबई-हावडा एक्स्प्रेस (गाडी क्र. १२८०९) च्या जनरल डब्यात एक अल्पवयीन मुलगा एकटाच बसलेला दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सदर अपहृत मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ चाइल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल कल्याण समिती यांना माहिती देण्यात आली. Railway police rescue Gondia मुलाला वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षेसाठी शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई रेल्वेचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग सोनवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी सुनील उईके यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार अरुण गोंदोडे, पोलिस शिपाई गिरीष राऊत, रंभाड व महिला पोलिस शिपाई प्रियंका नान्होरे यांनी पार पाडली.