‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीने 23 लाखांचा गंडा

75 लाखांचे चेक रोखण्यात यश

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
threat-of-digital-arrest : ‘तुमच्या आधार कार्डाचा वापर करून कॅनरा बँकेत तुमच्या नावाने 6 कोटी रुपये जमा झाले आहेत’, अशी बतावणी करणारा व्हिडिओ कॉल शुक्रवार, 10 एप्रिल रोजी मोहन केळापुरे यांना आला. यात ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी देऊन या भामट्यांनी त्यांच्याकडून 23 लाख रुपये उकळण्यात यशही मिळवले, पण पोलिसांच्या सतर्कतेने केळापुरेंचे 75 लाख मात्र बचावले.
 

jkl 
 
 
 
या सराईत भामट्यांच्या फोनने घाबरून निवृत्त मुख्याध्यापक केळापुरे यांनी त्यांना 23 लाख रुपये आरटीजीएसद्वारे आणि 75 लाखांचे धनादेश असे 98 लाख रुपये देऊनही टाकले. दर्डानगर परिसरात राहणाèया केलापुरे यांना या अज्ञातांनी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून धमकावले.
 
 
तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून कॅनरा बँकेत 6 कोटी तुमच्या नावाने जमा झाले आहेत. तुम्ही पैसे परत केले नाहीत तर तुम्हाला आम्ही अटक करून कारवाई करू, असे पोलिस आणि वकिलांच्या वेशभूषेत असणाèया भामट्यांनी सांगितले.
 
 
वेशभूषेतील या भामट्यांनी कायदेशीर कारवाईची भीती दाखविल्याने मुख्याध्यापकांनी 23 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ठगांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी त्यांनी 75 लाख रुपयाचे धनादेश बँक खात्यात जमा केले.
शनिवार, 11 एप्रिलच्या दुपारपर्यंत हा प्रकार सुरू होता. नंतर फसवणूक होत असल्याचा संशय आल्यावरून मोहन केळापुरे यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तातडीने एनसीसीआर पोर्टलवर तक्रार केली. त्याच दरम्यान धनादेशाचे पेमेन्ट थांबविण्याची विनंती बँकेला केली. त्यांनी तातडीने कारवाई करून 75 लाखांचे धनादेश वटविण्याची प्रक्रिया रोखून धरली.
 
 
सायबर पोलिसांच्या सतर्कतेने व सहकार्याने एनसीसीआर पोर्टलवरून 23 लाख रुपयांपैकी 1 लाख 10 हजार ‘होल्ड’ करण्यात यश आले. या सायबर भामट्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवण्याकरिता सायबर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
 
 
वेळीच सावध झाल्यामुळे आणि पोलिस व बँकेकडून सहकार्य मिळाल्यामुळे मोहन केळापुरे यांचे 75 लाख रुपये वाचले आहेत, हे या प्रकरणातील विशेष म्हणावे लागेल.