विकासाच्या नावाखाली गरीबांचे संसार उघड्यावर

-नगर परिषदेचा ‘प्रसिद्धीचा हव्यास’ -काँग्रेस सोशल मिडियाचा आरोप

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
priyadarshini-uike : शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण रस्त्याच्या कडेला छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना, यवतमाळ नगर परिषदेकडून त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि ‘रिल्स’ बनवण्यासाठी गरिबांचे संसार उघड्यावर आणू नका, अशी मागणी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी घेतली आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
 
 
k
 
 
कृष्णा पुसनाके यांच्या पत्रात नमूद आहे की, नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके केवळ प्रसिद्धीसाठी अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांच्या रोजगारावर कारवाई करत आहेत. शहराच्या विकासाचे कोणतेही ठोस धोरण नसताना, केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचे व्यवसाय उद्ध्वस्त करणे निषेधार्ह आहे.
 
 
या पत्राद्वारे पुसनाके यांनी काही मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रशासनाने गरिबांच्या रोजगारावर सुरू केलेली कारवाई तत्काळ थांबवावी, सुशिक्षित बेरोजगारांना नाममात्र दरात ‘व्यावसायिक गाड्या’ उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, यांचा समावेश आहे.
 
 
प्रशासनाने तरुणांना आधार देण्याऐजी त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केल्यास काँग्रेस सोशल मिडिया सेलच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कृष्णा पुसनाके यांनी दिला आहे.
आरोप सपशेल चुकीचे
 
 
रिल्ससाठी किंवा सोशल मिडियावर प्रसिद्धीसाठी कोणतेही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. दारव्हा मार्गावरील कोणतेही अतिक्रमण काढताना कोणत्याही व्हिडिओमध्ये मी नाही. त्यामुळे हे आरोप सपशेल चुकीचे आहेत. जी काही कारवाई झाली ती अतिक्रमणांवरच झालेली आहे. ते अतिक्रमण होतेच हेसुद्धा कोणीही नाकारलेले नाही. शहरातील सर्वच अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत.
अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके
अध्यक्ष, यवतमाळ नगर परिषद