वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीची हत्या

*एक युवक जखमी *गांधी चौकातील घटना

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
murder डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात डीजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीतून वाद चिघळला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची 5 युवकांनी चाकूने भोसकून हत्या केली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार, 14 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. रविकांत उर्फ रिक्की टेम्बुरकर (36, रा. इंदिरानगर, चंद्रपूर) असे मृतक युवकाचे नाव असून, अनिकेत गलबले (21) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.
 
 
वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीची हत्या
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध विहारातून तसेच प्रभागातून रॅली काढण्यात आली होती. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सामील झाले होते. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास इंदिरा नगरमधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्थेची रॅली गांधी चौकात पोहोचली. यावेळी डीजेच्या तालावर नाचताना युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या क्षुल्लक कारणावरून काही युवकांमध्ये वाद निर्माण झाला व त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. हा वाद मिटविण्यासाठी रविकांत व अनिकेत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.murder मात्र, संतप्त युवकांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. गंभीर जखमी अवस्थेत रविकांत यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरोपी रेहान पठाण याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत अवघ्या दोन तासांत बादल भैसारे, चेतन सोनवणे, सुहान पठाण व शेख जीशान (रा. सर्व चंद्रपूर) या उर्वरित चार आरोपींनाही अटक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कलम 103 (1), 109 (1), 189 (2), 189 (4), 190, 191 (2), 191 (3), 126 (3) 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.