नागपूर,
cbse-10th-results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई ) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट यश मिळवत शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे.
यंदा मॉन्टफोर्ट स्कूलची यामिनी आडे हिने ९९.२ टक्के गुणांसह शहरात अव्वल स्थान पटकावले. भारतीय विद्या भवनच्या श्रीकृष्णनगर शाखेतील रिषित अग्रवाल आणि आष्टी शाखेतील समृद्धी मंथापूरवार यांनी ९८.८ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे आघाडी घेतली. सिव्हिल लाईन्स शाखेतील सिद्धेश बंड (९८.२ टक्के ) आणि सेंटर पॉईंटची यशवी डागा (९८ टक्के ) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
शिवाजीनगर येथील अमोल उत्तरवार (९९ टक्के ) आणि रुद्र तायवाडे (९०.४० टक्के ) यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली. निकाल जाहीर होताच शहरातील शाळांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. विद्यार्थी व पालकांनी शाळांमध्ये गर्दी करून एकमेकांचे अभिनंदन करत जल्लोष साजरा केला. मित्रांसोबत आनंद व्यक्त करत हस्तांदोलन व अभिनंदनाचा वर्षाव झाला.
दरम्यान, अपयशी विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई कडून दुसऱ्या परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना गुण सुधारायचे आहेत, त्यांना १५ मेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दोन बोर्ड परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे.
नागपूर शहरात सुमारे ५० हून अधिक सीबीएसई शाळांमधील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी अनेक शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. भारतीय विद्या भवन, सेंटर पॉईंट, सेंट पॉल, रॉयल गोंडवाना, साऊथ पब्लिक स्कूल आदी शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या निकालातून विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.