बातमीची ‘दखल’ अन् ओबीसी वसतीगृहात सुविधा ‘दाखल’

पाणीटंचाईसह इतरही समस्यांचे संबंधित विभागाकडून निराकरण निर्वाह व भोजन भत्ताही मंजूर

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
गोंदिया
 OBC hostel Gondiya येथील ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे, स्वच्छतागृहाचा अभाव आदी अनेक समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. त्यात भोजन व निर्वाह भत्ता देण्यात आला नसल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणने होते. या अनुषंगाने ‘दैनिक तरुण भारतात’ बातमी प्रकाशित होताच संबंधित विभागाकडून या बातमीची दखल घेत ओबीसी वसतीगृहातील समस्यांचे निराकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा भोजन व निर्वाह भत्ताही मंजूर करण्यात आलेला आहे. तर तसे पत्रही संबंधित विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
 
tb news 
OBC hostel Gondiya शहराला लागूनच कुडवा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलांचे वसतिगृह असून या वसतिगृहात ७१ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. नियमानुसार, या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता आणि भोजन खर्च शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून भत्ता किंवा खर्च या विद्यार्थ्यांना दिला गेला नव्हता. त्यात येथील बोअरवेल पूर्णपणे कोरडी पडल्याने त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना प्रशासनाकडून येणार्‍या एकवेळच्या टँकरच्या पाण्यावर किंवा विकत घेतलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागत होती. यासह स्वच्छतागृह, सांडपाणी, तुंबलेल्या नाल्या, वारंवार वीज खंडित होणे, कुलरची कमतरता आदी अनेक समस्यांनी विद्यार्थी त्रस्त झाले होते. दरम्यान, ‘दै. तरुण भारत’मध्ये २ एप्रिल रोजी ‘ओबीसी वसतीगृहात ढिगभर समस्या’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. OBC hostel Gondiya  बातमीची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक किशोर भोयर यांनी त्याच दिवशी या वसतीगृहाला भेट दिली असता त्यांना तेथील वस्तूस्थिती दिसून आली. ज्याची दखल घेत त्यांनी त्वरीत सर्व समस्या सोडविण्याचे कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. तर स्वतः जातीने लक्ष देत वसतीगृहातील बोअरवेलवर नवीन पंप बसविणे, नवीन कुलर उपलब्ध करून देणे यासह घरमालकाला सुचना देत सांडपाण्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करवून घेण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांचा भोजन व निर्वाह भत्ताही मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, बातमीची दखल घेत ओबीसी वसतीगृहातील सर्व समस्या दूर करण्यात आल्याचा खुलासा पत्रही सहायक संचालक किशोर भोयर यांनी १४ एप्रिल रोजी जारी केला आहे.
 

OBC hostel Gondiya जिल्ह्यातील इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारत बांधकामाकरीता गोंदिया खुर्द येथे मंजुर झालेल्या जागेवर १६ कोटी ५२ लाख ४ हजार ७८३ रुपयाचा प्राथमीक अंदाजपत्रक सादर करण्यात आला असून मुलांच्या वसतिगृह बांधकामाकरीता दुग्ध व्यवसाय विभागाची कुडवा येथील ३ एकर जमीन प्रत्यार्पित करणेबाबत शासनाकडून मंजूरी प्राप्त झाली असून जागेच्या मोजणीची कार्यवाही सुरु असल्याचे पत्रात नमूद आहे.