रुग्ण व त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशीलता जपा

-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करून दिली जाणीव -एम्सचा दुसरा दीक्षांत सोहळा

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
president draupadi murmu डॉक्टरांना अनेकदा आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागतो. तरीही, अशा परिस्थितीतही त्यांनी रुग्ण व त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशीलता जपली पाहिजे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनीही वैद्यकीय व्यावसायिकांना नेहमी आदराने वागवले पाहिजे. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, अशी जाणीव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे करून दिली.
 
 
रुग्ण व त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशीलता जपा
 
मिहानमधील अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्न) दुसèया दीक्षांत सोहळ्यात त्या बोलत होत्या. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, अध्यक्ष डॉ. प्रशांत पंधरे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
राष्ट्रपती म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन व सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा व रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यशासह करुणेचा भाव जपल्यास तुम्ही एक उत्तम व्यक्तीही होऊ शकेल.
 
वैद्यकीय क्षेत्र केवळ एक व्यवसाय नसून संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा एक मार्गही आहे. एक वैद्यकीय चिकित्सक केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर तो आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा संचारही निर्माण करतो. चिकित्सकाचा सहानुभूतीचा सल्ला केवळ आजारी व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही आधार देतो.
आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा, प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून पुढे वाटचाल केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
 
राज्यपाल जिष्णूदेव वर्मा
मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व कर्करोगासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. नैराश्य, चिंता आणि व्यसनाधीनतेसारख्या मानसिक आजारांच्या समस्यांकडेही गांभीर्याने पुरविण्याची गरज निर्माण झाली असून आयुष्यमान भारतसारख्या योजनांमुळे लोक दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी शासकीय रुग्णालयांकडे वळत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.president draupadi murmu एम्स व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात व्यापक सहकार्याची गरज आहे. त्यातून संसोधन, अनुभव व कौशल्यांची देवाणघेवाण तसेच एकूणच आरोग्यसेवा व्यवस्थेच्या बळकटीकरणाला चालना मिळू शकेल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा, पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रताप जाधव
कुशल नेतृत्वाच्या मार्गदर्शनात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याच्या दिशेने अत्यंत उल्लेखनीय कार्य होत आहे. विद्यार्थी केवळ पदवीच प्राप्त करीत नाहीत, देशाची आरोग्य सेवा सशक्त करण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे, याकडे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
क्षणचित्रे
  • -राष्ट्रपतींचा हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध झाला. ठीक सकाळी 11 वाजता त्यांचा कॅनव्हॉय एम्सच्या आवारात शिरला. कार्यक्रम संपल्यानंतर ठीक 12 वाजता तो बाहेर पडला.
  • - अत्यंत आटोपशिर ठरल्याप्रमाणेच कार्यक्रम झाला. उपस्थित राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, कार्यकारी संचालक व अध्यक्षांची भाषणेही अगदी ठरवून दिलेल्या वेळेतच झाली. त्यांची भाषणे लिखित होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचे भाषण उत्स्फूर्त होते. राष्ट्रपतींनी अगदी साध्या- सोप्या हिंदीत भाषण करीत विद्यार्थी व उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
  • -राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे स्वागत डॉ. अनंत पंधरे, प्रताप जाधव यांचे स्वागत डॉ. प्रशांत जोशी यांनी केले.
  • -कार्यक्रमापूर्वी व नंतरही वंदेमातरम व राष्ट्रगीत म्हटले गेले.
  • -संपूर्ण भाषणे खास मूक-बधिरांसाठी व्यासपीठावरील निवेदिकेच्या शेजारी उभे राहून प्रशिक्षित महिला सांकेतिक भाषेत अनुवादित करीत होती.
  • -गुणवत्ताप्राप्त सात विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन गौरविले.
  • - विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, ज्येष्ठ मेंदूरोग तज्ञ पद््मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, निवृत्त आरोग्य उपसंचालक आनंद जयस्वाल, माधव नेत्रालयाचे डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री, ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. उदय बोधनकर, मेडिकल माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. सुधीर नेरळ आदींसह अनेक गणमान्य उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------------