नवी दिल्ली,
Registration for Amarnath Yatra यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार असून यात्रेकरूंना नोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ तसेच देशातील विविध बँकांच्या निश्चित शाखांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर बँक, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि ॲक्सिस बँक अशा अनेक बँकांमधून नोंदणी करता येणार असल्याने ही प्रक्रिया अधिक सोयीची करण्यात आली आहे. नोंदणी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार असून प्रत्येक मार्गासाठी दररोज ठरावीक संख्येची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक भाविकांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठरावीक तारखांसाठीची जागा भरल्यानंतर त्या तारखेचे नोंदणी प्रवेश काही दिवस आधीच बंद केले जाणार आहेत.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर यात्रेकरूंना संगणकीय पद्धतीने तयार करण्यात आलेला प्रवास परवाना देण्यात येणार आहे. या परवान्यात प्रवासाची तारीख, निवडलेला मार्ग आणि प्रवेशासाठी निश्चित वेळ यांचा तपशील नमूद असेल. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणून प्रत्येक यात्रेकरूला प्रवासादरम्यान ओळख पटवण्यासाठी विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. अमरनाथ यात्रा उंच डोंगराळ आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतून पार पडत असल्याने आरोग्यविषयक नियमांवर विशेष भर देण्यात आला आहे. केवळ तेरा ते सत्तर वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच यात्रेसाठी परवानगी दिली जाणार आहे. सहा आठवड्यांपेक्षा अधिक गर्भधारणा असलेल्या महिलांना या यात्रेसाठी नोंदणी करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक
याशिवाय प्रत्येक यात्रेकरूने अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिलेले आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यानंतर जारी केलेले हे प्रमाणपत्र तपासल्यानंतरच यात्रेला अंतिम परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी आरोग्य तपासणी करूनच नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यंदाची अमरनाथ यात्रा एकूण सत्तावन्न दिवस चालणार असून या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. यात्रेची सुरक्षितता, शिस्त आणि व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.