मुंबई,
Shahrukh-Bhansali together बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मोठी आणि चर्चेची जोडी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी तब्बल चोवीस वर्षांनंतर नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘देवदास’नंतर या दोघांनी एकत्र काम केले नव्हते, त्यामुळे या नव्या घडामोडीमुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात ॲक्शनप्रधान चित्रपटांमधून यश मिळवणाऱ्या शाहरुख खानने आता वेगळ्या प्रकारच्या कथांकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. त्यानुसार तो आपल्या वयानुसार अधिक परिपक्व आणि भावनिक छटा असलेली भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या कथेत तो पन्नास वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार असून त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि भावनिक प्रवास यावर चित्रपट आधारित असणार आहे.

या कथानकात शाहरुख साकारणाऱ्या पात्राचे करिअर कठीण टप्प्यातून जात असताना त्याची भेट एका उद्योजक महिलेबरोबर होते. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत जाते आणि या नात्याला प्रेमाचे रूप येते. मात्र पुढे त्यांच्या आयुष्यात कोणते वळण येते, हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. भावनिक गुंतागुंत, नात्यांचे बारकावे आणि जीवनातील वास्तव यांचा संगम या कथेत पाहायला मिळणार आहे. याआधीही भन्साळी आणि शाहरुख एका प्रकल्पासाठी एकत्र येणार होते, मात्र काही कारणांमुळे तो प्रयत्न अपूर्ण राहिला. आता मात्र दोघांमध्ये झालेल्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळत असल्याची चर्चा आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी या चित्रपटाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.