फतेहगड साहिब,
Six killed as bus overturns in Punjab पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला असून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सर्व जखमींना मोरिंदा आणि फतेहगड साहिब येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार बस अनियंत्रित झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर मोठा अपघात घडला. बस उलटल्यानंतर त्यामध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने घटनास्थळी भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा अपघात बस्सी पठाणा परिसरातील मोरिंदा–चुन्नी मार्गावरील हिममतपूरा गावाजवळ घडला. बसमधील सर्व यात्रेकरू मेन मजरा येथील रहिवासी होते आणि ते बैसाखी निमित्त श्री आनंदपूर साहिब येथे दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य राबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.