दुष्काळाचे भाग्यविधाता!

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
 
वेध. .
 
विजय निचकवडे
drought जे माझे नाही, तरीही ते मला सहज मिळते. पण हावरटपणा इतका वाढला की, ते सगळंच ओरबडून घेण्यापर्यंत आमची मानसिकता गेली. मग काय? आज निसर्गावरही आम्ही वरचढ झालो. कदाचित निसर्गावर विजय मिळविल्याच्या क्षणिक आनंदात ‘माणूस’ आज आपल्याच कृतीचे भविष्यात होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित करून समाधानाने जगतही असेल, परंतु येणारी पिढी ‘त्या’ परिणामांची ‘भोगी’ ठरेल हे नक्की! भूगर्भ कोरडा पडतो आहे. दुष्परिणाम डोळ्यापुढे आहेत. पण माणूस निसर्गाची ही देगणी त्याच्या मालकीची असल्यागत वागून स्वतःसाठी भविष्याच्या दुष्काळाची तजवीज करतो आहे. म्हणजेच आम्हीच आमच्या दुष्काळाचे भाग्यविधाता ठरू!
 

दुष्काळाचे भाग्यविधाता! 
 
महाराष्ट्र समृद्ध आहे. सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक अशा सर्व बाबतीत महाराष्ट्राची समृद्धी अधोरेखित झाली आहे. निसर्गानेही महाराष्ट्राला भरभरून दिले. निसर्गाचे जे सौंदर्य पाहण्यासाठी लक्षावधी रुपये खर्च करून बाहेर जावे लागते, अशा अनेक सौंदर्यांनी महाराष्ट्र नटला आहे. याच महाराष्ट्रात निसर्गाची एक वेगळी कृपादृष्टी आहे. महाराष्ट्रात 1000 ते 1200 मिली मीटर एवढे सरासरी पर्जन्यमान होते. पावसाळ्यात पडणारा हा पाऊस पाहिला तर अख्खा महाराष्ट्र ओलाचिंब करून टाकणारा आहे. पण तरीही आज महाराष्ट्रातील दुष्काळ संपत नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्रातील काही भागांची ओळखच दुष्काळी भाग म्हणून होत असेल तर आम्हीही आमच्या व्यवहारांचा, कृतींचा विचार करायला नको का?
 
निसर्गाने दिले, पण आपण ते किती टिकवितो यावर कधी कुणी मंथन केले आहे का? आज महाराष्ट्रातील एक दोन जिल्ह्यांची नव्हे तर बहुतांश जिल्ह्यांतील भूजलपातळी सातत्याने कमी होत आहे. आज महाराष्ट्रातील भूजल तणावाखाली आले आहे, याचा सांगोपांग विचार केलाच जायला हवा! खरं तर भूजलावर म्हणजे भूगर्भातील पाण्यावर तुमचा किती अधिकार आहे? तर तो शून्यच म्हणावा लागेल. ती तुमची मालकी नाही किंवा त्यासाठी तुम्ही पैसेही मोजत नाही. मान्य आहे, भूजलाचा उपसा करण्यासाठी असलेल्या साधनांची निर्मिती करण्यावर तुम्ही पैसे खर्च करता, म्हणून भूजल तुमच्या मालकीचे होत नाही. पण तरीही आज आपला मालकी हक्क असल्यागत कोणत्याही नियोजनाशिवाय आणि अवास्तव होत असलेला पाण्याचा वापर भविष्यातील संकटाची नांदी ठरत आहे. महाराष्ट्रातील भूजलापैकी 75 टक्के पाणी हे सिंचनासाठी आणि 85 टक्क्यांच्या आसपास ग्रामीण भागात पिण्यासाठी वापरले जाते. हे करताना अनियंत्रित उपसा आणि न होणारे पुनर्भरण निसर्गदत्त संपत्तीला संपविण्याचे काम करत आहे. वाढती विंधन विहिरींची संख्या, त्यासाठी असलेल्या नियमांना दिली जाणारी तिलांजली याचा परिपाक म्हणून आज 400 फुटाहून अधिक खोदूनही विंधन विहिरीला पाणी लागत नाही. आम्ही जमिनीला पोखरतो आहे, पण तिच्या वास्तवाचे भान विसरलो हे तेवढेच खरे!
 
आज महाराष्ट्रातील 42.5 टक्के भाग हा पाणी टंचाईग्रस्त म्हणजे दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी राज्यात भूजल पातळी 3 ते 4 टक्क्यांनी घटत आहे. आज काही भाग असा आहे, जेथे 700 ते 900 फुटापर्यंत खोदूनही पाण्याचा एक थेंब बाहेर पडत नाही. एवढं होऊनही जर आमची ओरबडणारी मानसिकता बदलणार नसेल, तर भविष्यातील जलसंकटाची ही नांदीच म्हणावी लागेल. ज्यावर तुमचा काहीही अधिकार नाही, त्याची मालकी असल्यागत वापरणाèया बुद्धिजीवींनी कधी तरी तासन्तास ओंजळीने पाणी भरून एखादा पाण्याचा हंडा घरी घेऊन जाणाèयांच्या समाधानात समाधान मानून बघा. माझ्या घरी आहे म्हणून वाटेल तेवढे पाणी रस्ता आणि घराचा पोर्च धुण्यासाठी वाया घालविताना जरा शेजारी पाण्यासाठी चिंतेत असलेल्यांची व्यथा जाणून घेण्याचे सौजन्य दाखवा. आज आहे म्हणून अपव्यय करायचा आणि नाही म्हणून रडगाणे गात बसण्यापेक्षा असलेेले उपाय प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.drought जलपुनर्भरण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग किती जण करतात, हा प्रश्नच आहे? निसर्ग तुम्हाला पाऊस पाडून संधी देतो, मात्र त्या संधीचे सोने करण्याची बुद्धीच आमच्याजवळ नाही. नियम, कायदे सर्व काही आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणाही आहे. पण त्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही कदाचित अजूनपर्यंत पाणीटंचाईची झळ पोहचली नसावी. म्हणून प्रशासनही निर्विकार आहे. पाण्याच्या उपशावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. काहीही घेणेदेणे नसल्यागत व्यवहार सुरू आहेत. अनेक वास्तू उभ्या होतात. जलपुनर्भरणाचा केवळ कागदोपत्री संकल्प सोडला जातो. आज आम्हाला मिळते आहे, म्हणून पाणी मुबलक वाटते. पण दिवसेंदिवस घटत चाललेली पाण्याची पातळी भविष्यात समृद्ध महाराष्ट्राला कधी वाळवंट बनवेल, याचा नेम नाही. अशावेळी भूजल आमच्या मालकीचे हा गैरसमज खोटा ठरेल, यंत्रणाही निष्भ्रम ठरतील आणि हतबल झालेला निसर्ग आपल्याला वाकुल्या दाखवीत असेल!
 
9763713417