तभा वृत्तसेवा
आर्णी,
accident : महागाव तालुक्यातील खडका येथील रहिवासी अंकित रवींद्र राऊत (वय 28) हा मंगळवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान आर्णीजवळ महामार्गावर दुचाकीने खडका येथून यवतमाळला जात असता त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली.
यात दुचाकी चक्काचूर झाली आणि चेहरा व कपाळावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अंकितचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांसह पोलिसांनी त्याला रात्रीच आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
महागाव तालुक्यातील खडका येथील रहिवासी अंकित राऊत यवतमाळ येथील इंडसइंड बँकेत कार्यरत आहे. मंगळवारी सुट्टीनिमित्त घरी परतला होता. आज पुन्हा ड्युटी असल्याने तो रात्रीच दुचाकी शाइन क्र. एमएच29 बीओ8782 ने यवतमाळला निघाला होता.
त्याच रात्री, अंकितचे नातेवाईक स्वप्निल राऊत यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंकित अविवाहित असून त्याला आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे.
ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात अतुल पवार आणि राजू रुद्राक्षवार यांनी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह राऊत परिवाराच्या सुपूर्द केला.