तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
nari-shakti-vandan-bill : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ यवतमाळ शहरात बुधवार, 15 एप्रिल रोजी भव्य पदयात्रा काढण्यात आली. महिला सक्षमीकरणाला बळ देणाèया या ऐतिहासिक निर्णयाच्या स्वागतासाठी यवतमाळातील नारीशक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ही पदयात्रा संध्याकाळी 5 वाजता उत्सव मंगल कार्यालय येथून निघून येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
नारीशक्ती वंदन विधेयक येत्या शनिवार, 18 एप्रिलला घोषित होत असल्यामुळे यवतमाळातील सर्व महिलाशक्ती अतिशय उत्साहात आणि आनंदात आहे. केंद्र सरकारच्या या विधेयकाला समर्थन दर्शवत शनिवार, 11 एप्रिल ते शनिवार, 18 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन नारीशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे. यवतमाळात विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिला व्यक्तिमत्त्वांना भेटी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेक महिला पत्राच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत. या विधेयकामुळे सामान्य गृहिणी ते सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नारीशक्तीला सन्मान मिळणार आहे.
आजपर्यंत महिला अनेक क्षेत्रात अग्रेसर होत्या. परंतु राजकीय क्षेत्रात त्यांची टक्केवारी कमी असल्यामुळे राजकारणात त्या फारशा सक्रिय नव्हत्या. परंतु नारीशक्ती विधेयकाच्या माध्यमातून सर्व महिलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नारीशक्तीचा सन्मान म्हणजेच देशाचा अभिमान या दृष्टीकोनातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच हा नवा अध्याय स्त्री सन्मानासाठी लिहिला गेलेला आहे. नारीशक्ती वंदन विधेयकामुळे लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार असून महिलांच्या राजकीय सहभागाला नवे बळ मिळणार आहे.
त्यामुळेच यवतमाळ नारीशक्तीने भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. या नारीशक्ती वंदन पदयात्रेत यवतमाळकर महिलांच्या विविध संस्था, संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शैला मिर्झापुरे, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, नगरसेवक रेखा कोठेकर, डॉ. माणिक मेहरे, डॉ. ललिता घोडे, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य, महिला नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.