कर वसुलीत वर्धा पालिका विदर्भात अव्वल

*नगराध्यक्ष पांगुळ यांनी मांडला १०० दिवसांचा लेखाजोखा

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
tax-collection : नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळून १०० दिवस पूर्ण झाले. पदभार सांभाळल्यानंतर घनकचरा आणि पाणी समस्येवर काम सुरू केले. यासोबतच कर वसुलीबाबत मोठा टप्पा गाठला आहे. मार्च महिन्यात करधारकांसाठी अभय योजनेत ८५ टके वसुली करून वर्धा नगरपालिका कर वसुलीत विदर्भात अव्वल ठरली, अशी माहिती नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिली.
 
 
K
 
 
नगराध्यक्ष पांगुळ पुढे म्हणाले की, इंझापूर येथील कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त झाले होते. एक महिन्यात येथील कचर्‍याचे विलगीकरण करण्यात आले असून येत्या आठ दिवसात नागरिकांची धूर आणि दुर्गंधीपासून मुतता करण्यात येईल. नपकडे ४ कोटींचे वीज बिल थकीत होते ते आता १ कोटीवर आले असून हळूहळू निरंक करण्यात येईल. करापोटी २ कोटींची सवलत देण्यात आली. यावर्षी १२ कोटींचे कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. अभय योजनेंतर्गत तब्बल साडेआठ कोंटींची कर वसुली करून वर्धा अव्वल ठरली आहे. ही योजना पूर्ववत करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. परवानगी प्राप्त होताच पुन्हा ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
पवनार येथील पम्पिंग स्टेशनवर ६ कोटींचा सोलर पॅनल प्रकल्प उभारण्यात येणार असून या माध्यमातून महिन्याला ५ लाख ५० हजारांची बचत होईल. तर येळाकेळी येथेही सौर योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. स्मशानभूमीच्या मागील बाजूस नपची जवळपास ५ एकर जागा असून तिथेही सोलरचा उपक्रम राबविण्याचे प्रयोजन आहे. यातून बिलापोटी लाखो रुपये वाचतील. पथदिव्यांवर २५ लाखांचा खर्च असून तो कमी करून उर्वरित पैसा आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेवर खर्च करण्यावर आपला भर राहणार आहे. जीवन प्राधीकरणचे ४.५० कोटी रुपये देणे असून १५ व्या वित्त आयोगाचा निधी या कामी लावू. कचर्‍याची सर्वात मोठी समस्या असून सामाजिक संघटनांना सोबत घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहनही पांगुळ यांनी केले.
 
 
कोर्टासमोरील हॉकर्स प्लाझा बचतगटाच्या महिलांना देण्याचे नियोजन आहे. सिटी पार्किंगसाठी नियोजनाचा विचार सुरू आहे. वर्धेत पालिकेचे १८२ गाळे असून ४९ अधिकृत मालकांची माहिती आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये करावयाच्या कामांचा अ‍ॅशन प्लॅन बनविण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष पांगुळ यांनी दिली.
 
 
पत्रकार परिषदेला गटनेता परवेज खान, मुन्ना झाडे, प्रदीप जग्याशी, श्वेता पाठक, आदी नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ ठिकाणी सायकल स्टॅण्डचे नियोजन
 
 
पावडे चौकापासून पुढे असलेल्या महावीर उद्यानाच्या सुरक्षा भिंतीजवळच कचर्‍याचे ढिगारे लागतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. सोबतच उद्यानात येणार्‍या नागरिकांसह लहान मुलांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागतो. नगरपालिकेने सुरक्षा भिंतीजवळ खड्डे खोदले असून तिथे गट्टू लावण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी उद्यानालगत कचरा टाकू नये यासाठी येत्या दोन महिन्यात सुशोभीकरण करून तिथे सायकल स्टॅण्ड सुरू करणार असल्याची माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात नगराध्यक्ष पांगुळ यांनी दिली.