‘आडवी बाटली’साठी महागावच्या महिला सज्ज

-जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद -उद्या होणार निर्णायक मतदान

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
women-of-mahagaon : महागाव प्रभाग 1 मधील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या तैलचित्रासमोर देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आल्याने स्थानिक महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रस्त्याने जाणाèया विद्यार्थी, शेकडो कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर घाला घालणाèया या दारू दुकानाविरुद्ध महिलांनी लोकशाही मार्गाने लढा उभारला आहे.
 
 
kl
 
 
 
महिलांच्या या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत ‘बाटली आडवी’ करण्यासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, 16 एप्रिल रोजी या ऐतिहासिक निर्णयासाठी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर महिलांनी परिसरात भव्य जनजागृती रॅली काढून घराघरात जाऊन मतपत्रिकेची डमी प्रत दाखवत नागरिकांना ‘बाटली आडवी’ करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
 
 
सावित्रीबाई फुले कन्या शाळेत सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून यामध्ये दारू दुकान बंद करण्यासाठी ‘आडवी बाटली’ आणि सुरू ठेवण्यासाठी ‘उभी बाटली’ अशी दोन चिन्हे ठेवण्यात आली आहेत. या ऐतिहासिक निर्णयासाठी 146 महिला आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी होणार असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 
 
दारूबंदी संघर्ष समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीत नगर पंचायत अध्यक्ष रंजना आडे, उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, नगरसेवक जयश्री संजय नरवाडे, नगरसेवक रामराव नरवाडे, सुरेश नरवाडे, शैलेश कोपरकर, छाया नरवाडे, अनिता गावंडे, सविता रुणवाल, सुलोचना राठोड, संजीवनी भेंडे, पंजाब राठोड, बळीराम राठोड, दिनेश भेंडे, रफिक सुरय्या, रियाज पारेख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.
 
 
महिलांच्या या ठाम आणि संघटित भूमिकेमुळे दारूबंदीच्या दिशेने महागावात एक नवे सामाजिक पर्व सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.