रिसोड,
मराठी साहित्यात एक नवीन दृष्टीकोन आणणारी रंगनाथ पिराजी धांडे यांच्या 'Zoland Novel' झोलांड कादंबरीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६ चा कादंबरीचा प्रथम पुरस्कार १४ एप्रिल रोजी घोषित झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर च्या पुरस्कारांसाठी झोलांड कादंबरीची निवड झाल्याचे अकादमीचे सचिव प्रकाश घानगिने यांनी कळविले आहे.
अकादमीचे पुरस्कार वितरणाचे हे अठरावे वर्ष असून या पुरस्काराचे वितरण डॉ.भालचंद्र ब्लड बॅक,बस स्थानक मागे येथे २८ एप्रिल २०२६ रोजी अकादमीच्या दुसरे साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,शाल व प्रशस्तिपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात येईल. कादंबरी विभागात प्रथम क्रमांक झोलांड ला प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक सचिन अवघडे सांगली यांच्या फक्कड कादंबरीला तर तृतीय क्रमांक बा.बा.कोटंबे परभणी यांच्या उन सावलीच्या शोधात कादंबरीला प्राप्त झाला. झोलांड कादंबरीला प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने चळवळकेंद्री कादंबरीच्या परंपरेत वेगळे स्थान अधोरेखीत झाले. आंबेडकरी चळवळ ही केवळ एका घटकांसाठी मर्यादित नाही तर शोषित, पीडित व वंचित या समस्त घटकांच्या उत्थानासाठी आहे.
'Zoland Novel' डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जीवनमूल्य म्हणून स्विकारणे ही काळाची गरज आहे. हे स्पष्ट विशद करणारी झोलांड कादंबरी आहे. या कादंबरीला वर्हाडी बोलीभाषेची झालर आहे.त्यामुळे ती या मातीशी इमान ठेवून आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळ्यांवरील गुंतागुंतीच्या गट-तटाच्या समस्यांचा वेध घेऊन आंबेडकरी चळवळ मानवमुक्तीची सामाजिक चळवळ आहे, असा महत्त्वपूर्ण सुतोवाच झोलांड कादंबरीत आहे.