सनशाईनच्या विद्यार्थ्यांचा सलग १२ तास वाचनाचा उपक्रम

ग्रंथ, बालसाहित्य आणि संविधानावर आधारित साहित्याचे केले वाचन आंबेडकर जयंतीचे औचित्य

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
कारंजा (घा.),
12 hours of continuous reading activity डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्थानिक सनशाईन स्कूल येथे आयोजित करण्यात आलेला १२ तासांचा वाचन उपक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सलग चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या वाचन उपक्रमात प्रेरणादायी ग्रंथ, बालसाहित्य तसेच भारतीय संविधानावर आधारित साहित्याचे वाचन करण्यात आले.

तग  
या उपक्रमाची संकल्पना संस्थाध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रेम महिले आणि सचिव विजय ठाकरे यांची असून, वाचन संस्कृती रुजविणे आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश यशस्वीरित्या साध्य झाला. समारोप प्रसंगी कारंजाचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन यांनी उपक्रमाचे कौतुक करताना, अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. माजी प्राचार्य प्रेमदास मोहोड, भाजपा तालुकाध्यक्ष चक्रधर डोंगरे, समाजसेवक निलेश मस्के, भाजपा नेते सुदीप भांगे, वृक्षमित्र परिवारचे संयोजक विलास वानखेडे, डॉ. मृणाल टूले, समाजसेवक अशोक नागले, दिनेश रायचुरा, प्रीती महिले आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या उपक्रमामुळे वाचनाची सवय दृढ झाली असून सलग १२ तासांच्या वाचनामुळे नियमित वाचनाची आवड निर्माण झाली. दीर्घकाळ वाचन केल्यामुळे लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता वाढली. यासोबतच विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांमध्ये सुधारणा झाली, विचारशती व आकलन क्षमता विकसित झाली तसेच भारतीय संविधान व आंबेडकरी विचारांवरील वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा, समता व जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. उपक्रमादरम्यान आंबेडकरी विचारांचा जागर घडवून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. संपूर्ण दिवस शाळेत वाचनाचा उत्सव साजरा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यास हा उपक्रम अत्यंत उपयुत ठरला. हा उपक्रम समाजात वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यत केली