आलापल्ली वनपरिक्षेत्रात संतापाचा वणवा!

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
अहेरी, 
Alapalli forest एकीकडे वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागात सध्या अंतर्गत कलहाचा भडका उडाला आहे. आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. जी. गनवीर यांच्या कथित मनमानी, भ्रष्ट आणि अमानवीय कारभाराला कंटाळून आलापल्ली क्षेत्रीय वन कर्मचार्‍यांनी आरपारची लढाई पुकारली आहे. आज, 16 एप्रिलपासून विभागीय कार्यालय आलापल्ली येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
 

Alapalli forest  
 
आंदोलक कर्मचार्‍यांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये क्षेत्रीय कर्मचार्‍यांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही करून गुलामांप्रमाणे वागवले जात आहे, कार्य आयोजनातील मंजूर कामे अंदाजपत्रकीय रकमेच्या केवळ 25 ते 30 टक्के निधीतच पूर्ण करा, अन्यथा कामे करू नका, अशी दबावतंत्राची भूमिका अधिकार्‍यांनी घेतली आहे, सन 2024 पासून जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत झालेली सर्व कामे ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध जपून आणि केवळ स्वतःच्या फायद्याचे निकष लावून केले, क्षेत्रीय महिला कर्मचार्‍यांशी बोलताना अश्‍लील आणि अशिष्ट भाषेचा वापर केला जातो, मानसिक दबाव टाकून त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहे, मजुरांची मजुरी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होऊनही दोन-तीन महिने ती दिली जात नाही, आरडीजीएसद्वारे मजुरांच्या खात्यात रक्कम टाकताना आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
Alapalli forest  मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही वरिष्ठांनी संबंधित अधिकार्‍यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. न्याय मिळत नसेल तर लढा देण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका घेत कर्मचार्‍यांनी आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.