वैभवशाली इतिहास! 'या' मालिकेत 1000 हून अधिक कलाकार

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bharat Ek Khoj १९८८ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘भारत एक खोज’ या ऐतिहासिक मालिकेने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. भारताच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या इतिहासाचे सखोल व प्रभावी चित्रण करणारी ही मालिका आजही तितकीच महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या मालिकेचा आधार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या सुप्रसिद्ध ग्रंथावर होता.
 

 Bharat Ek Khoj 
या मालिकेची संकल्पना त्या काळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर भारताच्या खऱ्या इतिहासावर आधारित एक माहितीपूर्ण आणि संशोधनाधारित मालिका तयार करण्याचा त्यांचा विचार होता. श्याम बेनेगल यांनी ही संकल्पना स्वीकारल्यानंतर विस्तृत संशोधन आणि नियोजनाला सुरुवात झाली.‘भारत एक खोज’च्या निर्मितीत सुमारे २५ लेखक आणि ३५ इतिहासकारांचा सहभाग होता. मालिकेतील प्रत्येक भाग ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि तथ्यपूर्ण असावा यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. शमा जैदी यांच्या नेतृत्वाखाली लेखनकार्य पार पडले. संपूर्ण मालिका तयार करण्यासाठी तब्बल ११ महिने आणि १७ दिवसांचा कालावधी लागला.
 
 
या मालिकेतBharat Ek Khoj  एकूण ५३ भाग होते आणि त्यामध्ये १००० हून अधिक कलाकारांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे, सुमारे ३५० नवोदित कलाकारांना या मालिकेमुळे अभिनयाची पहिली संधी मिळाली. रोशन सेठ यांनी पंडित नेहरूंची भूमिका साकारत मालिकेचे सूत्रसंचालनही केले. ओम पुरी यांनी सम्राट अशोक, औरंगजेब आणि दुर्योधन यांसारख्या विविध व्यक्तिरेखा साकारत आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. याशिवाय नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी, शबाना आजमी, पल्लवी जोशी, पीयूष मिश्रा आणि इरफान खान यांसारखे दिग्गज कलाकारही या मालिकेत झळकले.या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने मुंबईतील फिल्मसिटी, गोरेगाव येथे करण्यात आले. त्यासाठी तब्बल एक वर्षासाठी दोन फ्लोअर्स आरक्षित करण्यात आले होते. तसेच ताज महल आणि पश्चिम घाट यांसारख्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांवरही शूटिंग करण्यात आले.
 
 
दर रविवारी Bharat Ek Khoj  सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत. त्या काळात संपूर्ण देश टीव्हीसमोर एकत्र येऊन ही मालिका पाहत असे. सुमारे ५००० वर्षांच्या भारतीय इतिहासाचा मागोवा घेत ‘अनेकतेत एकता’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात ‘भारत एक खोज’ यशस्वी ठरली.आजच्या डिजिटल युगातही ‘भारत एक खोज’ ही मालिका भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा संदर्भ मानली जाते. तिच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या भूतकाळाशी जोडण्याचे कार्य आजही सुरू आहे.