पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची तंबी
बेलसनी परिसरातील कोल वॉशरीजची केली पाहणी
चंद्रपूर,
'Coal washeries' pollution चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी परिसरातील ‘कोल वॉशरीज’मुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पृष्ठभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवार, 16 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण पसरवणार्या ‘कोल वॉशरीज’वर कठोर कारवाई होणार, अशी तंबी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधितांना दिली. विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोल वॉशरीजमुळे होणार्या प्रदूषणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. प्रदूषण पूर्णपणे कमी करण्यासाठी ठोस आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका मुंडे यांनी चंद्रपूरच्या दौर्याप्रसंगी घेतली. या दौर्यात आ. मुनगंटीवार जिल्हाधिकारी वसुमना पंत, सिओई पुलकित सिंह आदी सहभागी झाले होते.
'Coal washeries' pollution महामाया कोल वॉशरीजमुळे परिसरातील शेतकर्यांच्या कापूस पिकावर मोठ्या धुळीचा थर साचला आहे. त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानुसार शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज माझ्या दौर्याच्या पृष्ठभूमीवर परिसराची स्वच्छता करण्यात आली असली, तरी ही तात्पुरती उपाययोजना असून, पुढील भेटीदरम्यान प्रदूषणात लक्षणीय घट झालेली दिसली पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला.
मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खंत
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी, संयुक्त समितीच्या अहवालात सुमारे 60 ते 65 टक्के नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने नुकसान भरपाई देण्याची शिफारस आहे. आज, शेतकर्यांना नुकसान भरपाईचे धनादेश मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित गती दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.