नवी दिल्ली,
csk-players-out-of-the-team : आयपीएलच्या मध्यात सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू अचानक संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. आधीच अडचणीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आता आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमद आता आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मात्र, संघाने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
वेगवान गोलंदाज खलील अहमद यावर्षी सीएसकेसाठी आयपीएलचे सर्व सामने खेळत आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही, पण चौथ्या आणि पाचव्या सामन्यात त्याने प्रत्येकी एक बळी घेतला. केकेआरविरुद्धच्या सीएसकेच्या शेवटच्या सामन्यात तो जखमी झाला होता. यानंतर तो संघाबाहेर जाईल अशी भीती होती, पण आता याला दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की, चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. १४ एप्रिल रोजी केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यादरम्यान त्याने उजव्या नितंबात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो सीएसकेच्या सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले की, ही ग्रेड २ ची दुखापत असून, पुनर्वसनासाठी किमान १०-१२ आठवडे लागतील. डावखुरा वेगवान गोलंदाज खलीलने भारतासाठी ११ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले असून, त्याचा शेवटचा सामना जुलै २०२४ मध्ये झाला होता.
सीएसकेची परिस्थिती सध्या बिकट आहे. संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पाच सामने खेळून, संघाने केवळ दोन जिंकले असून तीन गमावले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यात चार गुण शिल्लक आहेत. संघाचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात खलील उपलब्ध नसेल; संघ कशी कामगिरी करतो आणि खलील अहमदच्या जागी कोणाला संधी दिली जाते हे पाहणे बाकी आहे.