नेेमेचि येतो उन्हाळा...

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
वेध. ..
 
नीलेश जोशी
heatstroke फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. एप्रिल-मे महिन्यात तर तापमानाचा उच्चांक गाठला जातो. या महिन्यांमधील अनेक दिवस साधारणतः 43 ते 46 अंशापर्यंत तापमान कायम राहते. स्वाभाविकच या कालावधीत उष्माघाताचे अनेक बळी जातात. ही परिस्थिती गत काही वर्षांतील आहे असे नसले तरी तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या दिवसांमध्ये सतत वाढ होत आहे. म्हणूनच याकडे केवळ ऋतुबदलाचा परिणाम असे न पाहता वाढत असलेल्या तापमानाच्या कारणांची मीमांसा करणे आणि त्यासाठीच्या उपाययोजना सातत्याने, योग्य वेळेत करणे आवश्यक आहे. मुख्यतः वृक्षतोड आणि अन्य मार्गाने पर्यावरणाची होणारी हानी, झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण सोबतच हवामानातील बदल या सर्वांचा संयुक्त परिणाम तापमान वाढीवर होतो. सतत वाढणारे तापमान हे जीवघेणे ठरत आहे. दरवर्षी उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने अनेक वेळा उष्माघाताच्या मृत्यूची नोंद योग्य पद्धतीने न झाल्याने प्रत्यक्ष आणि शासकीय आकडेवारीत तफावत जाणवते. यावर्षी देखील वर्धा, अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मानवी जीविताच्या रक्षणासाठी यावर उपाययोजना गरजेच्या आहेत. ‘नेमेचि येतो उन्हाळा’ असे म्हणून दुर्लक्ष करणे हे भविष्यातील अडचणी वाढविणारे ठरेल.
 

नेेमेचि येतो उन्हाळा... 
 
 
सतत वाढणारे तापमान आणि उन्हाळ्यातील उष्माघाताने होणारे मृत्यू ही समस्या केवळ विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा, अमरावती या शहरांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर आणि खेड्याची आहे. अशाच प्रकारच्या समस्येने गुजरातमधील अहमदाबाद शहर त्रासले होते. मात्र त्यांनी काही उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आणि त्यानंतर येथे उष्माघाताच्या मृत्यूच्या संख्येत कमालीची घट झाली. अहमदाबाद हे देशातील ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ यशस्वीपणे राबविणारे पहिले शहर आहे. 2010 साली भीषण उष्णतेच्या लाटेत अहमदाबाद येथे अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2013 मध्ये स्थानिक महानगरपालिकेने पूर्वसूचना प्रणाली, जनजागृती, नागरिकांनी घ्यावयाची काळजी या मुद्यांवर शासकीय यंत्रणांसह विविध सामाजिक संस्थांनी काम केले. परिणामी उष्माघाताचे मृत्यू घटले. या अ‍ॅक्शन प्लॅनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली. तर देशातील 30 शहरांनी अशा प्रकारची योजना अंमलात आणली. वाढत्या तापमानामुळे होणाèया मृत्यूसाठी अशा प्रकारची सूक्ष्म योजना करणे आवश्यक असले तरी मुळात तापमान वाढू नये याकरिता देखील सर्वच स्तरातून प्रयत्नांची गरज आहे. खरं तर सर्वत्रच वाढते काँक्रिटीकरण आणि कमी होणारी हिरवळ ही मूळ समस्या आहे. कारण एका संशोधनानुसार, काँक्रिट पृष्ठभाग सूर्य ऊर्जा 80-90 टक्के शोषतो, तर हिरवळ केवळ 20-30 टक्के उष्णता शोषते. म्हणूनच यावर सर्वोत्तम उपाय हा गाव, खेेडे, शहरात ठिकठिकाणी ‘हरित पट्टे’ निर्माण करणे हा ठरू शकतो. वृक्ष, उद्याने, जलस्रोत, हिरवळ हे केवळ सौंदर्यवर्धनासाठी नसून ती तापमान नियंत्रणाची नैसर्गिक यंत्रणा आहे. ‘हरित पट्टे’ असलेल्या भागात 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कमी असते. तर हिरवळ वाढल्यास हवेतील प्रदूषण देखील 20 ते 30 टक्के कमी होते. झाडांच्या सावलीखाली असलेल्या भागात जमिनीचे तापमान 10 ते 15 टक्के कमी असते. असे एक ना अनेक फायदे हरित पट्ट्यांचे आहेत. सुदैवाने अद्याप तरी शहरात आणि शहरालगत मोेठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असून याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्थाद्वारे हरित पट्टे निर्माणाचे कार्य करता येईल.heatstroke मोठ्या शहरात नागरिकांनी उजाड झालेल्या बगिच्यांच्या संवर्धनासाठी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत तर शासनाने बांधकाम नियमांमध्ये 20 ते 30 टक्के हिरवळ, वृक्षतोडीवर कडक नियंत्रण असे धोरणात्मक निर्णय घेतले तर पुढील काही वर्षात वाढत्या तापमानाच्या समस्येवर नियंत्रण मिळविता येईल.आपल्या संस्कृतीत ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः’ अर्थात ही वसुंधरा आमची माता आहे आणि आम्ही तिचे पुत्र आहोत, असे म्हटले आहे. म्हणून स्वाभाविकच वसुंधरेच्या रक्षणासाठी आवश्यक असणारी प्रत्येक बाब आपले कर्तव्य आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण हे देखील महत्त्वाचेच. म्हणूनच रा. स्व. संघाने पंचपरिवर्तनात पर्यावरण या विषयाचाही समावेश केला आहे. वाढते तापमान हे अपमृत्यूला कारणीभूत ठरणारे असून एक प्रकारची ती आरोग्य आणिबाणी म्हणावी लागेल. यावर मात करण्यासाठी समाजातील सज्जन शक्तीला पुढाकार घ्यावा लागेल हे निश्चित!
9422862484