आमचा काय गुन्हा, शेकडो कुटुंबांची आर्त हाक
दिग्रस,
Digras Municipal Council दिग्रस नगर परिषद हद्दीत अनधिकृत ठरवलेल्या ९ लेआऊटमधील सर्व प्रकारच्या व बांधकामांना पूर्णतः स्थगिती देण्यात आल्याने शेकडो प्लॉटधारकांचे घराचे स्वप्न भंगल्याने आमचा गुन्हा तरी काय असे म्हणत ते संताप व्यक्त करत आहेत. यवतमाळ येथील नगररचना सहायक संचालकांच्या चौकशी समितीच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी गेल्या वर्षी २६ मार्चला दिग्रस शहरातील या नऊ लेआऊटची मान्यता रद्द केली आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी अतुल पंत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करुन येथील त्या नऊ लेआऊट मालकांच्या हाती आदेशाची प्रत देऊन त्यांना तर घाम फोडला. मात्र प्लॉट घेणार्यांवर मोठे संकट कोसळले, असा हा विषय आहे. प्लॉटधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा समावेश आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची सगळी बचत या प्लॉटस्मध्ये गुंतवली आहे. कुणी स्वतःचे छोटेसे उभे करण्याचे स्वप्न पाहिले होते, तर कुणी मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ही गुंतवणूक सुरक्षित ठेवली होती. त्यांची सर्व स्वप्ने अधांतरी राहिली आहेत.
Digras Municipal Council ‘आम्ही आयुष्यभर कष्ट करून थोडेथोडे पैसे साठवले आणि एक प्लॉट घेतला. आता तो विकताही येत नाही, आणि त्यावर घरही बांधता येत नाही, आम्ही करावे तरी काय..’ असा सवाल प्लॉटधारक करत आहेत. ही केवळ जमीन किंवा व्यवहाराची बाब नाही, तर हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी, त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी निगडित समस्या असून, कोणी व कसा सोडवायचा असा हा विषय आहे.
रद्द करण्यात आलेले ९ लेआऊट
(१) शेत सर्वे क‘. ५४/५५ (नवीन) ६६/६७ (जुना) क्षेत्रफळ १.८२ हेक्टर. एलजी पार्क बनगिनवार व इतर ८. (२) शेत सर्वे ५४/५५ (नवीन) ६६/६७ (जुना) क्षेत्रफळ ०.०७९ हेक्टर. रवींद्र केशव पाटील. (३) शेत सर्वे ६६/१ क्षेत्रफळ १.६२ हेक्टर. बंग लेआऊट २, अजय विजय बंग. (४) शेत सर्वे १३४/१ क्षेत्रफळ १.४३ हेक्टर. गोल्डन पार्कला लागून म. मोईन अ. लतीफ. (५) शेत सर्वे १४८/१ क्षेत्रफळ पैकी ०.८१ हेक्टर. मां तुळजाभवानी नगर, नारायण उकंडा अस्वार. (६) शेत सर्वे ३०/१ब क्षेत्रफळ १.७३ हेक्टर. कृष्णभूमी संजय विजय बंग. (७) शेत सर्वे ३०/१अ क्षेत्रफळ १.६० हेक्टर. कृष्णभूमी संजय विजय बंग. (८) शेत सर्वे ३०/२अ क्षेत्रफळ ०.८० हेक्टर. कृष्णभूमीला लागून संजय विजय बंग. (९) शेत सर्वे ६३/१ क्षेत्रफळ २.६७ पारस रेसिडेन्सी मेहता लेआऊट, लक्ष्मी रिखबचंद मेहता.