मुंबई
Sunita Ahuja Krushna बॉलिवूडमधील ‘हिरो नं. 1’ म्हणून ओळखले जाणारे गोविंदा त्यांची पत्नी सुनिता आहुजा आणि भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता संपल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका भावनिक व्हिडिओमुळे या पुनर्मिलनाची चर्चा रंगली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुनीता अहुजा, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मिरा शाह एकत्र दिसत आहेत. दीर्घकाळानंतर समोरासमोर आल्यानंतर सुनीता आणि कृष्णा भावूक झाल्याचे दिसते. दोघांनी एकमेकांना मिठी मारत जुने मतभेद विसरण्याचा संकेत दिला. हा क्षण उपस्थितांसाठीही विशेष ठरल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडिओमध्ये सुनीता अहुजा यांनी “१४ वर्षांचा वनवास संपला,” असे म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यावर कृष्णा अभिषेकनेही भावना व्यक्त करत, “हे आमच्यासाठी मोठं सरप्राईज होतं. त्या शोमध्ये सहभागी होतील याची कल्पनाही नव्हती. या भेटीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला,” असे सांगितले.
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक Sunita Ahuja Krushna यांच्यातील मतभेदांमुळे दोघांमध्ये संवाद पूर्णपणे बंद झाला होता. २०१६ साली द कपिल शर्मा शो मध्ये कृष्णाने केलेल्या एका विनोदामुळे हा वाद अधिक चिघळल्याचे सांगितले जाते. त्यानंतर, जेव्हा गोविंदा आणि सुनीता अहुजा यांना शोमध्ये आमंत्रित केले जाई, तेव्हा कृष्णा अभिषेक त्या भागांपासून दूर राहत असे.मात्र, या काळात कृष्णाने अनेकदा सार्वजनिकरित्या मामा-मामीसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुनीता अहुजा यांनीही या वादावर अनेकदा स्पष्ट भूमिका मांडली होती. आता दोघांनीही भूतकाळ मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे या व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे.