तर अमेरिकची जहाज उडविणारी!

बंदरांवरील नाकेबंदीनंतर इराण संतप्त

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
तेहरान,
Iran angry after blockade of ports इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव पुन्हा तीव्र झाला असून, बंदरांवरील निर्बंध आणि नौदल हालचालींमुळे दोन्ही देशांमध्ये थेट संघर्षाची भाषा सुरू झाली आहे. अमेरिकेकडून इराणच्या बंदरांवर कठोर सागरी निर्बंध लागू करण्यात आले असून, या निर्णयानंतर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शांतता चर्चेतील अपयशानंतर अमेरिकेने इराणच्या सागरी मार्गांवर नियंत्रण वाढवत अनेक महत्त्वाच्या बंदरांमधून होणारी जहाजांची ये-जा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. अमेरिकन सैन्याने या क्षेत्रात गस्त वाढवून जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
 
 

ports 

दबावाला भीक न घालण्याचा इशारा
या कारवाईनंतर इराणच्या वरिष्ठ लष्करी सल्लागारांनी कठोर इशारा दिला असून, अमेरिकेच्या जहाजांना लक्ष्य करण्याची भाषा वापरण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कोणत्याही परकीय जहाजावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इराणच्या लष्करी नेतृत्वातील काही अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, कोणत्याही दबावाला भीक न घालण्याचा इशारा दिला आहे.इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत, अमेरिकेच्या नौदलाला लक्ष्य करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, इराणकडे क्षेपणास्त्र प्रणाली सक्षम असून, कोणत्याही आक्रमक हालचालीला प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण आहे.
 
 
दरम्यान, अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इराणवरील सागरी निर्बंध कोणत्याही प्रकारे शिथिल केले जाणार नाहीत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या क्षेत्रातील सर्व जहाजांवर देखरेख ठेवली जात असून, नियमांचे पालन होण्यासाठी सैन्य सतत सक्रिय आहे. होर्मुझ सामुद्रधुनी आणि आसपासच्या सागरी भागात नौदल गस्त वाढवण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय नौवहन सुरक्षित ठेवणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून, पुढील काळात दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.