काजळसर्‍यात तणाव, पोलिसांवरही दगडफेक

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
 
देवळी, 
Kajalsara village case देवळीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या काजळसरा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवार १५ रोजी मद्यपी तरुणाने धुडगूस घातल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तसेच प्रकरण निवळण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या वाहनांवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली असून यात वाहनांचे नुकसान झाले. तर गृहरक्षक दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला. यावेळी कार्यक्रमात धुडगूस घालणार्‍या तरुणावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
 
 
Kajalsara
 
मिळालेल्या माहितीनुसार, काजळसरा येथील बौद्ध विहारात जयंतीनिमित्त जेवणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत सुरू असताना गावातीलच रवींद्र दुधे यान कार्यक्रमस्थळी येऊन महिला व आयोजकांना शिवीगाळ केली. त्यानंतर जेवणाची पंगत सुरू असताना दुचाकी थेट पंगतीत घालून पंगत उधळून लावली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संताप निर्माण झाला. यावरून आयोजक व संबंधित व्यतीमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. घटनेची माहिती पोलिस पाटलाद्वारे देवळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे संतप्त काही नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिस वाहनाची मागील काच फुटली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शेकडो महिला- पुरुषांनी देवळी पोलिस स्टेशन गाठून घेराव घालत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच कोणतीही चौकशी न करता लाठीचार्ज केल्याबाबत निषेध व्यत केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.
 
 
Kajalsara village case उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे यांनी तात्काळ देवळी येथे पोहोचून संतप्त जमावाशी चर्चा केली. आरोपीवर योग्य कारवाई व गावातील अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे तसेच नागरिकांच्या सर्व मागण्यांवर योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवळली. देवळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली असून काजळसरा गावात तणावपूर्ण शांतता आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.