Leopard captured घनदाट जंगल शिवाराला लागून असलेले तालुक्यातील धाबेटेकडी/आदर्श गाव व परिसर सद्या बिबट्याचे हब झाले असून दोन दिवसांपूर्वी एका नरभक्षी बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्यानंतर आता दुसर्या बिबट्याने या भागात ऐंट्री केली आहे. त्यामुळे धाबेटेकडी परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम असताना ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard captured धाबेटेकडी (आदर्श) हे गाव गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या सिमेवर जंगल शिवाराला लागून आहे. त्यामुळे अनेकदा या भागात वन्यप्राण्यांचा वावर दिसून येते. दरम्यान, १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या प्रज्वल गोवर्धन मेश्राम या ६ वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने फरकटत नेऊन सुमारे ५०० मीटर अंतरावरील जंगलात ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या घटनेनंतर गावात भीतीचे सावट पसरले असतानाच १३ एप्रिल रोजी रात्री बिबट्याने राजू इनवाते यांच्या गोठ्यातील म्हशीच्या पिल्लावर हल्ला करून ठार केल्याने दहशतीत आणखी भर पडली. या पार्श्वभूमीवर वन विभाग व नवेगावबांध शीघ्र बचाव पथकाकडून शोध मोहिम राबवून १४ एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत सदर बिबट्याला जेरबंद करून नागपूर येथे हलविण्यात आले. त्यामुळे गावकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, दुसर्याच दिवशी १५ एप्रिलच्या रात्री गावात पुन्हा एका बिबट्याचे दर्शन झाले. परिणामी गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून बिबट्याची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.
शेतकर्यांच्या चिंतेत वाढ ...
सद्या परिसरात उन्हाळी धान, मका तसेच मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर मोठ्या संख्येने शेतात व जंगल परिसरात जातात. अशा परिस्थितीत बिबट्यांचा गावशिवारात वाढता वावर ग्रामस्थांसह शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.