गोंदिया,
Man-eating leopard finally captured अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी परिसरात काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. मंगळवारी १४ एप्रिल रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. १० एप्रिल रोजी अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले होते. वन विभागाने तत्काळ सापळे लावून आणि शोधमोहीम राबवून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. वन विभाग, व नवेगाव बांध शीघ्र बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर मंगळवारी रात्री बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
पकडण्यात आलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा नर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे, तसेच बचाव पथकातील सतीश शेंडे, अमित राऊत, शुभम मेश्राम, अमोल चौबे, विकी ब्राह्मणकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्याला पुढील तपासणीसाठी नागपूर येथे हलवण्यात आले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे यांनी सांगितले.
लावली जीवाची बाजी...
सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागातर्फे परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान, बचाव पथकातील शुभम मेश्राम, सतीश शेंद्रे, अमित राउत यांनी जीवाची बाजी लावत स्वतः पिंजऱ्यात बसून बिबट्याला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया पार पाड़ली. यानंतर सदर बिबट्याला नागपूर टीटीसी येथे हलविण्यात आले.