जळगाव
MPSC stenographer सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदांच्या भरती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे जळगावसह राज्यभरातील हजारो उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलले गेल्याची भावना व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
२०१८ आणि २०२२ मध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अनेक वर्षे ही भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही. आता शासनाने ही भरतीच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करत मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. शासनाने आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला MPSC stenographer आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने आणि आर्थिक अडचणींवर मात करत स्टेनोग्राफर पदासाठी प्रशिक्षण घेत होते. मात्र अचानक भरती रद्द झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असल्याची भावना उमटत आहे. “चार-पाच वर्षे आम्ही याच तयारीत घालवली, आता अचानक दिशा बदलणे शक्य नाही,” अशी खंत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील विविध विभागांमध्ये स्टेनोग्राफर पदांची मोठ्या प्रमाणावर रिक्तता असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरली जावीत, अशी त्यांची मागणी आहे.या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि भवितव्याबाबतची अनिश्चितता लक्षात घेता, शासन यावर पुनर्विचार करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.