मुंबई
Mumbai water crisis राज्यात वाढलेली उष्णता, बदलते हवामान आणि धरणांमधील घटलेला पाणीसाठा यामुळे मुंबई शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला असून, यावर अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमध्ये सध्या सुमारे ३३.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा सध्याच्या वापरानुसार ७ जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, हवामान विभागाने यंदा पावसाला उशीर होण्याची शक्यता वर्तवल्याने जुलै आणि ऑगस्ट या काळातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, उपलब्ध साठा अपेक्षेपेक्षा कमी वेगाने टिकून राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.
काय आहे निर्देश
मुंबईला तानसा, भातसा,Mumbai water crisis मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. १५ एप्रिल २०२६ च्या आकडेवारीनुसार भातसा धरणात सर्वाधिक पाणीसाठा असून, इतर धरणांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा थोडा जास्त असला तरी तो पूर्ण सुरक्षित मानता येत नाही. २०२६ मध्ये ३३.६० टक्के, २०२५ मध्ये ३०.२४ टक्के आणि २०२४ मध्ये २४.५४ टक्के इतका साठा नोंदवण्यात आला होता.राज्य सरकारने मुंबई महापालिकेला जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १० टक्के कपात लागू झाल्यास पावसाळा सुरू होईपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी परिस्थिती पाहता पाणी कपात होण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.