नांदेड
child drowning case शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एमजीआर फंक्शन हॉलच्या मागील बाजूस खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही चारही मुले घरी परतत असताना हा अपघात घडला. परिसरात सुरू असलेल्या नाल्याच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता, ज्यात पावसाचे व साचलेले पाणी जमा झाले होते. त्या खड्ड्याच्या काठावरून जाताना एका मुलाचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्यानंतर इतर तीन मुलेही त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
खड्ड्यात मोठ्या child drowning case प्रमाणात पाणी आणि चिखल असल्यामुळे चारही मुले त्यात अडकली आणि बाहेर पडू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत मुलांचे वय आठ ते बारा वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांमध्ये महोमद अली, महोमद फुरखान, महोमद अदनान आणि महोमद रेहान यांचा समावेश असून, फुरखान आणि अदनान हे सख्खे भाऊ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.या परिसरात महापालिकेकडून खासगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरू असल्याची माहिती असून, कामासाठी खोदलेला खड्डा उघडाच सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असून, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.