‘नाशिक फाइल्स’चा स्फोट; कंपनीत टाळेबंदी

दीडशे कर्मचाऱ्यांना घरून कामाचे आदेश

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |

नाशिक,
Nashik Files Explosion नाशिकमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत घडलेल्या 'नाशिक फाइल्स' प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणाशी संबंधित नवनवीन तपशील सातत्याने समोर येत असून तपासाची व्याप्तीही वाढताना दिसत आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने कंपनीचे स्थानिक कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आले असून सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी कंपनीच्या राजधानीतील पथकाकडून तपास सुरू करण्यात येणार आहे.
 
 
 
Nashik Files Explosion tcs
मानवी तस्करीच्या कोनातूनही चौकशी सुरू
दरम्यान, या प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न आणि महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या आरोपांचीही अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयानेही कंपनीत तपासणी मोहीम राबवली असून कागदपत्रांची छाननी करून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तपासासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना त्या वेळी कार्यालयात कोणीही कर्मचारी आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथकही लवकरच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहे. या प्रकरणात परदेशातील दुव्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पीडितांपैकी दोन तरुणींना परदेशात पाठवण्याचा डाव असल्याची शक्यता तपासात पुढे आली असून मानवी तस्करीच्या कोनातूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
 
 
 
तपास गेला दहशतवादविरोधी पथकाकडे
तपासादरम्यान शहरातील त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका विशिष्ट निवासस्थानी वारंवार मेजवानी आयोजित केल्याची नोंद आढळून आली आहे. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम होत असल्याचे समोर आले असून संबंधित नोंदवही ताब्यात घेण्यात आली आहे. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची व व्यवस्थापनाची चौकशी सुरू असून या मेजवानीदरम्यान काही तरुणींना आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. २०२२ ते २०२३ या कालावधीत अशा कार्यक्रमांचे आयोजन झाल्याचेही तपासात समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला असून त्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. संबंधित अधिकारी आरोपींची थेट चौकशी करणार असून स्थानिक पोलिसांकडूनही तक्रारदारांची माहिती गोळा केली जात आहे. केंद्र स्तरावरील यंत्रणांनीही या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे तपास अधिक व्यापक आणि गंभीर पातळीवर सुरू आहे.