...तरच थांबेल विकृतीची पुनरावृत्ती

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
 
अग्रलेख...
distortion stop महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत, समंजस आणि प्रगल्भ भूमीला सध्या एका भीषण विकृतीने ग्रासले आहे. नाशिक, परतवाडा-अचलपूर, आर्णी असो की मूल शहर, बातम्यांचे मथळे तेवढे बदलत आहेत. त्यामागची काळी कृत्ये आणि स्त्रीजन्म घेतलेल्या पीडितांचे अश्रू मात्र सारखेच आहेत. त्यातील अनेक प्रकरणांना ‘लव्ह जिहाद’चा आयामही आहे. लव्ह जिहाद हा आता हा शब्द केवळ राजकीय वादविवादाचा विषय उरलेला नाही. सुनियोजित गुन्हेगारीचे ‘मॉडेल’चे म्हणूनही हा प्रकार समोर येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची टीसीएस कंपनी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले हजारो विद्यार्थी टीसीएसकडे रोजगाराच्या आशेने बघतात. या कंपनीच्या नाशिक कार्यालयात महिला कर्मचाèयांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे मोठा गदारोळ उडाला आहे. गोमांस खाण्यासाठी दबाव टाकणे, हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवणे, हिंदू मुलींना आमिष दाखवून अत्याचार करणे असा सारा बीभत्स प्रकार तिकडे घडला. त्यात कळस म्हणजे, ‘द केरला स्टोरी’मध्ये जे दाखवले, तसेच कारस्थान या ‘टीसीएस’च्या कार्यालयात घडले. कार्मिक व्यवस्थापक असलेल्या विशिष्ट समाजाच्या अधिकारी महिलेने स्वधर्माच्या कर्मचाऱ्यांशी हिंदू मुलींना ठरवून जोडले. धर्मांतर आणि अत्याचारासाठी प्रवृत्त करण्याबाबत तिच्यावर लावण्यात आलेला आरोप हा ‘लव्ह जिहाद’च आहे.
 
 

distortion stop 
 
 
नाशिकच्या खरात प्रकरणाने समाजाची झोप उडवली आणि त्यानंतर गावागावांतून अत्याचाराची प्रकरणे बाहेर येण्याचा वेग वाढला. त्याच विकृतीची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून-गावांतून होताना दिसत आहे. अशा सर्व घटनांकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे पुरेसे नाही, तर त्यामागची कट्टरपंथी मानसिकता आणि सामाजिक विघटनाचे षडयंत्र समजून घेणे गरजेचे झाले आहे.
 
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूरच्या घटनेत विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या कार्यकर्त्याने ज्या प्रकारे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले, ते सर्वसामान्यांना धक्का देणारे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ‘स्नॅपचॅट’सारख्या ‘अ‍ॅप्स’चा वापर करून मुलींना विश्वासात घेणे, त्यांची खाजगी चित्रफीत मिळवणे आणि त्यानंतर त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत लाखो रुपयांचे दागिने व रोकड उकळण्याचा धक्कादायक प्रकार हा ‘फायनान्शिअल टेररिझम’ म्हटला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीच्या घटनेत प्रेमाचे आमिष दाखवून अवघ्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. केवळ ग्रामीण किंवा निमशहरी भागातच हे संकट मर्यादित राहिलेले नाही. सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘कॉर्पोरेट’ जगालाही ही विषवल्ली विळखा घालत आहे. कामाच्या ठिकाणी देखील जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव होणे आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाचे प्रकार घडणे हा नवा ‘सोशल ट्रेंड’ होऊ पाहत आहे. अशा अग्रगण्य कंपन्या अंतर्गत कलहाने आणि शोषणाने पोखरल्या जातात, तेव्हा ती केवळ प्रशासकीय चूक उरत नाही. ते एका मोठ्या सामाजिक रोगाचे लक्षण ठरते. कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणे हा विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. तिथेही धर्मांध किंवा जातीय मानसिकतेतून होणारे शोषण सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणेच आहे. ही विकृती तथाकथित ‘व्हाईट कॉलर्ड’ गुन्हेगारीच्या रूपात आपल्या जागतिक महासत्ता होण्याच्या स्वप्नांनाही सुरुंग लावत आहे. बहुतांश घटनांतील साम्य म्हणजे, पीडित प्रामुख्याने हिंदू समाजातील तरुणी किंवा अल्पवयीन मुली आहेत आणि आरोपी एका विशिष्ट समुदायातील संघटित आणि विघातक विचारसरणीचे आहेत. हे असे काही ऐकले, वाचले की कानात मुंग्यांचे वारूळ उठते. खरे तर, या उघड झालेल्या काही वाणगीदाखल घटना आहेत. असे कितीतरी प्रकार गावातल्या गावात घडून आणि विरून गेले असतील.
 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार आणि विविध महिला संघटनांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुली बेपत्ता होत आहेत. त्यातील मोठी संख्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींची असते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर केरळ, कर्नाटक आणि आता उत्तर भारतातही अशा घटनांचे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याचे विविध अहवाल सांगतात. यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींना स्थानिक पातळीवर राजकीय आणि धार्मिक संघटनांचे पाठबळ मिळते. अचलपूरमधील ‘एमआयएम’ कार्यकर्त्याच्या अटकेतून ते सिद्धही झाले आहे. अशा विकृत प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध करणे पुरेसे नाही. ही प्रवृत्ती समाजात कर्करोगासारखी पसरत असल्याने तिला कायमचे संपविले पाहिजे. प्रेमाच्या किंवा कथित सौहार्दाच्या बनावाखाली चालणारा हा ‘जिहाद’ आहे, हे समस्त हिंदू समाजाने समजून घेतले पाहिजे. या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढणे हे समाजाचे कर्तव्य आहे आणि ती गरजही आहे. एखादा समाज आपल्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित होतो, तेव्हा त्या समाजापुढे असे काही तरी संकट असते. ते दिसत नसते, पण समाजाला पोखरत असते. त्यामुळे प्रत्येकाने सावध असणे आणि आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे अपरिहार्य आहे. आधुनिकता वर्ज्य नाही, पण त्या नावाने अतिरेक होत असेल तर तो थांबविलाच पाहिजे. अशा घटनांतील गुन्हेगारांना कठोरतम शिक्षा तर व्हायलाच हवी, शिवाय त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्यां राजकारण्यांच्याही शक्तिपात होणे आवश्यक आहे. या समाजकंटकांचे अस्तित्व कायम असणे हा भारताच्या भविष्यासाठीचा अत्यंत मोठा धोका आहे.
 
या भीषण परिस्थितीवर केवळ पोलिस कारवाई हा अंतिम उपाय असू शकत नाही. तो असता तर विकृतींची पुनरावृत्ती समोर आली नसती. खरे तर, ही वैचारिक आणि सामाजिक लढाई आहे. हे हिंदू समाजाविरुद्धचे षडयंत्र आहे. त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तन संकल्पनेतील ‘कुटुंब प्रबोधन’सारखा विषय अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. धावपळीच्या कुटुंबव्यवस्थेत संवाद हरवत चालला आहे. मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करून, त्यांना सामाजिक धोक्याची जाणीव करून देणे ही पालकांची मोठी जबाबदारी असताना ती पाळली जाताना दिसत नाही. घरात संस्कारांची शिदोरी भक्कम असली तर बाह्य प्रलोभने टिकत नाहीत. घरच्या प्रेमाची सर बाहेरच्या विषाक्त प्रेमाला येऊच शकत नाही.distortion stop पण त्यासाठी कुटुंबात संवाद आवश्यक आहे. कामाच्या व्यापाच्या नावाखाली ते होत नसेल, तर आपले नुकसान ठरलेले आहे. ते आज होईल किंवा उद्या. हिंदूंनी आता कुटुंबात अधिक लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलींना स्वधर्माचा अभिमान आणि अन्यांच्या कट्टरतेचे, वाईट प्रवृत्तीचे वास्तवही समजावून सांगितले पाहिजे. समाज माध्यमांच्या आभासी जगात कोण मित्र आणि कोण शत्रू, हे ओळखण्याची दृष्टी मुलांना देणे आवश्यक आहे. गल्ली आणि मोहल्ला स्तरावर दक्षता समित्या स्थापन करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. सामाजिक संघटनांनी अशा विषयांवर सामूहिक बैठक घेऊन दबाव गट निर्माण केले पाहिजे.
 
महाराष्ट्राच्या भूमीला संतांचे आणि वीरांचे अधिष्ठान आहे. येथे छेडछाड किंवा शोषण करणाऱ्यांचे हात छाटणारी शक्ती नेहमीच समोर आली आहे. ती शक्ती जागी केली पाहिजे. काळाची हाक ओळखली पाहिजे. असे प्रकार ही सामाजिक आणि सांस्कृतिक आक्रमणाच्या पल्याड हिंदू समाजाची कुटुंबे नासवण्यासाठी घडविले जात आहेत. कायद्याचा बडगा आणि संस्कारांची ढाल या दोन्हींच्या जोरावरच आपण या विळख्यातून नव्या पिढीला वाचवू शकू. प्रशासन आणि न्यायव्यवस्था त्यांचे काम करेलच, पण समाज, कुटुंब, पालक म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि संघटित होऊन अशा विकृतीचा समूळ नाश करण्यासाठी सज्ज झालो पाहिजे. विकृतीची पुनरावृत्ती होत असेल तर त्यात विकृतांचा दोष असतोच, पण अशा पुनरावृत्तीत ज्यांना टार्गेट केले जाते, ज्यांचे नुकसान होते, त्यांचा अजिबातच दोष नाही, असेही म्हणण्यात अर्थ नाही. त्यांना रोखायचे असेल तर आपण संघटित व सक्रिय होऊन हिंदू समाजातील मुलीबाळींच्या संरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे.