प्रकरणात राजकारण नको
शिवराय कुलकर्णी यांची मागणी
अमरावती,
Parthwada sex racket case परतवाडा येथील सेक्स रॅकेटची व्याप्ती अतिशय मोठी असून या प्रकरणात कोणत्याही पक्षांनी राजकारण न आणता पिडीत मुलींना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी केले. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
शिवराय कुलकर्णी म्हणाले, सुमारे तीन दिवस अल्पवयीन मुलींचे, तरुणींचे अत्यंत अश्लील व्हिडीओ काही हॅण्डलवरून प्रसारीत करण्यात आले आणि पाहता पाहता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अशावेळी केवळ भाजपानेच पुढाकार घेत पोलिसांशी संपर्क साधला आणि भाजपानेच पहिले आंदोलन केले. यात स्थानिक मुली मोठ्या प्रमाणावर अडकल्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताच त्यांनी तक्रारदार समोर यायच्या आधी कोणतीही हयगय न करता सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश दिले आणि काही तासांतच मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाल्यानंतर काँग्रेससह अन्य पक्षांचे नेते बोलू लागले. मात्र निवडणुकीच्या काळात गठ्ठा मतांसाठी दाढ्या कुरवाळणार्या काँग्रेस पक्षातील एकही जण हे व्हिडीओ व्हायरल होत असताना बोलला नसल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात अडकलेल्या बहुतांश मुली मुस्लीम समाजाच्या असल्याची भाजपाला पूर्ण कल्पना असतानाही भाजपने कणखर भूमिका घेतली.
Parthwada sex racket case कुठल्याही समाजाची, धर्माची पंथाची मुलगी असो ती आपल्या बहिण, मातेसमान आहे, या भावनेतून भाजपाने आवाज उठवला होता. पण काँग्रेसने निवेदन देण्याचे जे तोंडदेखले नाटक केल्यानंतर यशोमती ठाकूर आणि भाई जगताप यांनी अमरावतीत ज्या मुलींची फसवणूक झाली त्या मुलींनाच दोष दिला. त्या मुलीच या सगळ्याला जबाबदार आहेत. त्या अशा कशा वागू शकतात, ही त्यांची विधाने ही आरोपीची नावे समोर आल्यावरची आहे. ज्या तरुणींना ब्लॅक मेल करून फसवले गेले त्यांनाच दोषी ठरवणे ही यशोमती ठाकूर यांची संवेदन शून्यता असल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले. आरोपींची सारी नावे मुस्लीम असल्याचे पाहून काँग्रेसने या प्रकरणाचा खरात प्रकरणाशीही संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. खरात याच्यावर कारवाई का नाही झाली असे काँग्रेस म्हणते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तातडीने कारवाई केली तशी कारवाई अशा प्रकरणात क्वचितच होते. खरात प्रकरण लोकांना ठाऊक होण्यापूर्वीच त्याच्यावर कारवाईही झाली होती. परतवाड्यातील आरोपी मुस्लीम असल्याने काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या प्रकरणाला जातीय वळण देत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. आरोपी हिंदू असते तर याच पक्षांनी एकच आकांत केला असता, असे सांगून कुलकर्णी म्हणाले की या प्रकरणात एकही हिंदू मुलगी नसली तरीही ज्या पिडीत मुली आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे शोषण करायचे, व्हिडीओ काढायचा आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करत एका घरातील तीन तीन मुलींचे शोषण करायचे ही यातील मोडस ऑपरेंडी आहे. यात राजकारण आणता कामा नये. या प्रकरणातील मुलींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निर्भयपणे पुढे येत पोलिसात तक्रारी कराव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. त्यांची नाव उघड होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.