अमरावतीत झाले मुलींचे लैगिक शोषण

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
आरोपींची संख्या झाली आठ
अचलपूर फाइल्स
 
अमरावती, 
Parthwada sexual abuse case परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने पिडित मुलींना वेगवेगळ्या पाच ठिकाणी फिरवून त्यांचे लैंगिक शोषण अमरावती येथील एका फ्लॅटवर केल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणात गुरूवारी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आल्याने आरोपी संख्या ८ झाल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
 
paratwada
 
Parthwada sexual abuse case  ८ पिडित मुलींचे १८ व्हिडीओ व ३९ फोटो फक्त आतापर्यंत आढळून आल्याचे पोलिसांनी आज पुन्हा स्पष्ट केले. तपासा दरम्यान आरोपी अयान याने पिडीत मुलींचे लैगिक शोषण त्याच्या अमरावती येथील मित्राने भाडयाने घेतलेल्या फ्लॅटवर केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या मित्राचे नाव मानव दिपक सुगंधे (वय २० वर्ष, रा. आर्वी, ह.मु.अमरावती) असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय अयानने मुलींना अन्य पाच ठिकाणी नेले होते. त्यातील दोन ठिकाणे अमरावती व तीन ठिकाणे अचलपुरातील आहे. सहा महिन्यांपासून हे कृत्य सुरू होते. अश्लील व्हिडीओ क्लीप आरोपीतांकडून प्राप्त करून सोशल मिडीयावर प्रसारित करणार्‍या रैफाज खान मंजुर खान (वय २६ वर्ष), मो. इमरान मो. साजीद (वय २१ वर्ष), शे. नावेद शे. हसन (वय २१ वर्ष), तिघेही रा. अचलपूर यांना सुध्दा अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल तसेच घरझडती दरम्यान आरोपी अयफाज याचे ताब्यातून लॅपटॉप, टॅब, हार्डडीस्क जप्त करण्यात आले आहेत. त्याची फॉरेन्सिक तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या चार आरोपींना २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तसेच मुख्य आरोपी अयान याने मानव सुगंधे याच्या ज्या फ्लॅटवर पिडितांचे यौन शोषण केले आहे, त्याठिकाणचा पंचनामा केला असून तो सील करण्यात आला आहे. फ्लॅट मालकाची चौकशी सुरू आहे. पिडीत मुलींची व त्यांचे पालकांची ओळख पटवून त्यांना तक्रार देण्याकरीता पुढे येण्यास पोलिसांकडून व सामाजिक संस्थांद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. सदर प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
‘त्या’ पोलिसांच्या चौकशीचे आदेश
मुख्य आरोपी अयान यांच्यासोबत काही पोलिसांनी वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो आधार घेऊन सदर पोलिसांची बदली करण्यात आली आहे. तसेच एक पिडीता व पालक काही दिवसांपूर्वी तक्रारीसाठी आले असता त्यात काही पोलिसांनीच पुढाकार घेऊन समेट घडवून आणल्याचे समोर आले होते. या सर्व मुद्दांची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक शुभमकुमार यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे विशाल आनंद यांनी सांगितले.
सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास
सदर प्रकरण फारच गंभीर असल्याने सर्वच शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. कोंचिग क्लासेसचा मुद्दा पुढे आला होता, त्याचाही तपास सुरू आहे. व्हिडीओ कुठे विकण्यात आले का, याचाही शोध घेतल्या जात आहे. आरोपींच्या जप्त मोबाईलमधून डाटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. राजकीय मंडळींनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वक्तव्य करावी. त्यांच्याकडे कोणती विशेष माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले.