मातृभाषेला प्रथम प्राधान्य द्या : राष्ट्रपती मुर्मू

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
 
वर्धा, 
भारतीय भाषांचा अभिमान बाळगून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा विरोध न करता मातृभाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. जगातील कोणतीही भाषा शिका. परंतु, आपली भाषा प्रथम ठेवा. सेवाग्राम आश्रम भेटीदरम्यान महात्मा गांधी यांचा साधेपणा, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा उपस्थित होत्या.
 
 
President Draupadi Murmu
 
राष्ट्रपती मुुर्मु पुढेे म्हणाल्या की, गांधीजींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देशाला सशत, आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करून त्यांनीं पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पदक विजेत्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व शिक्षणाचा उपयोग केवळ वैयतिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा. नवकल्पना, मूल्याधारित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या आधारावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
 
 
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे आंतरभाषा संवाद घडून येतो. हिंदी ही समृद्ध भाषा आहे. हिंदीसह भारतीय भाषांचा प्रत्येकाने गौरव बाळगला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी इंग्लंडमध्ये शिकले. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी सामाजिक चळवळ उभारली. परंतु, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी भारतीय भाषेलाच प्राथमिकता दिली. हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
 
 
पदवीदान समारंभात विद्यार्थिनींनी अधिक पदके पटकावल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. सन २०४७ साली देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पुर्ण होणार आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक महिलांनी आपले योगदान दिले. आता विकसित भारताच्या निर्मितीसोबतच विविध क्षेत्राच्या प्रगतीसाठी युवकांसोबतच युवतींनी देखील खांद्याला खांदा लावून योगदाने द्यावे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सदाचार, नैतिकता व सामाजिक उत्तरदायित्व जपत राष्ट्रविकासात योगदान दिले पाहिजे. डिजीटल युगात हिंदी भाषेची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. ती केवळ भाषा नाही तर अभिव्यक्ती आणि संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविणारे माध्यम आहे, असे ते म्हणाले.
 
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत राज्य शासन शिक्षण क्षेत्रात रोजगाराभिमुख बदल घडवित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले शिक्षण धोरण लवचिक, कौशल्य प्रदान करणारे आणि विद्यार्थी केंद्रीत असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. यावेळी President Draupadi Murmu  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विविध विद्याशाखेच्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आल्या. प्रास्ताविक कुलपती प्रा. कुमुद शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला आ. दादाराव केचे, विशेष पोलिस महानिरिक्षक संदीप पाटील, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.