वर्धा,
President Draupadi Murmu visits Bapukutti राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गुरुवार १६ रोजी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच परिसरात वृक्षारोपण केले. सूत कताई करताना त्या प्रसन्न मुद्रेत होत्या. चेहर्यावर स्मित हास्य आणत त्यांनी आश्रमातील महिला सहकार्यांना, ‘आप बताईये मुझे क्या करना है’ असे म्हणून त्यांनी सूत कताईला प्रारंभ केला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदन पाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आश्रमात बापुंचे पहिले निवासस्थान असलेले आणि आता आदि निवास म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदि निवाससह बापुंचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या बापु कुटीस भेट देऊन पाहणी केली.

सोबतच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा’ निवास व बापुंच्या तत्कालीन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बापुंचे निवास व बापुंशी संबंधित अनेक बाबींची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली. आश्रम भेटीनंतर त्यांनी बापुकुटी परिसरात बेल प्रजातीच्या वृक्षाचे रोपण केले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी., विशेष पोलिस महानिरिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.