नाशिकच्या धक्क्यानंतर पुण्यात ‘आयटी अलर्ट'

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
पुणे,
Pune IT नाशिकमधील एका आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या गंभीर लैंगिक छळ आणि संबंधित गुन्हेगारी प्रकरणानंतर आता त्याचे पडसाद पुण्यात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कामगार आयुक्त कार्यालयाने पुण्यातील आयटी कंपन्या तसेच इतर आस्थापनांची तपासणी सुरू केली असून, कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत नियमांची अंमलबजावणी तपासली जात आहे.
 

Pune IT companies POSH compliance check 
नाशिकमध्ये समोर आलेल्या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक छळासोबतच इतर गंभीर प्रकार, तसेच काही संघटित स्वरूपातील गैरकृत्ये उघड झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कामगार विभागाने पुण्यातील कंपन्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कामगार आयुक्त कार्यालयाने पुणे जिल्ह्यातील विविध आयटी कंपन्यांना नोटिसा पाठवत ‘लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा’ (POSH Act) अंतर्गत आवश्यक असलेल्या अंतर्गत तक्रार समित्यांची (Internal Complaints Committee) स्थापना केली आहे का, याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्यांकडे अशी समिती अस्तित्वात नाही, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित Pune IT अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणीही केली जाणार असून कंपन्यांनी सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामगार विभागाने महिला कर्मचाऱ्यांनाही पुढे येण्याचे आवाहन केले असून, कार्यस्थळी लैंगिक छळाबाबत कोणतीही तक्रार असल्यास थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे. कामगार उपायुक्तांनी नाशिकमधील घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच राज्यभरातील कंपन्यांनी सतर्क राहून कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तज्ञांच्या मते, आयटी क्षेत्रात वाढत्या प्रमाणात कर्मचारीसंख्या आणि बदलती कार्यसंस्कृती लक्षात घेता कार्यस्थळी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे राबविणे अत्यावश्यक झाले आहे. नाशिकप्रमाणेच इतर ठिकाणीही अशा घटना टाळण्यासाठी ही तपासणी मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.