ठाणे,
Sahar Sheikh Not Reachable ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख यांच्याभोवती सध्या वादाचे सावट निर्माण झाले आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या घडामोडीनंतर सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे दोघेही संपर्काबाहेर असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. ठाणे विभागीय कार्यालयाकडून जात प्रमाणपत्राबाबत नकारात्मक निष्कर्ष समोर आल्यानंतर दोघेही गेल्या दोन दिवसांपासून उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर त्यांनी अधिकृत भूमिका अद्याप मांडलेली नाही. दरम्यान, प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपांवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप
या सर्व घडामोडींमध्ये सहर शेख यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देत आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांकडून द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असून आपण सत्याच्या बाजूने उभे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कठीण काळातही विश्वास टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मागास प्रवर्गासाठी असलेला वेगळा नमुना वापरून जात प्रमाणपत्र मिळवले. त्याच आधारावर सहर शेख यांनीही संबंधित प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत विविध शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचा आरोप असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एकूणच, या घडामोडींमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काळात प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.