छत्रपती संभाजीनगर,
Sanjay Shirsat शहरातील महापालिका इमारतीच्या जागेबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. कब्रस्तानच्या जागेवर महानगरपालिकेची इमारत उभी असल्याने “इथे आत्म्यांचा वावर आहे” आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होत असल्याचे विधान त्यांनी केल्याने विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मंत्री शिरसाट यांनी महापालिका इमारत स्थलांतरित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “या ठिकाणी आत्मे असल्याने कधी कधी त्रास होतो. त्यामुळे इमारत दुसऱ्या ठिकाणी बांधली तरच मुक्ती मिळेल,” असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून विरोधकांनी त्यावर टीका केली आहे.
दरम्यान, याच कार्यक्रमात Sanjay Shirsat शहरातील विकासकामांबाबतही त्यांनी माहिती दिली. रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा प्रकल्प आणि अग्निशमन यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.मात्र, कब्रस्तानच्या जागेशी संबंधित वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमकडून तीव्र शब्दांत टीका करण्यात आली असून अशा विधानांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.