कोटामध्ये स्लीपर बस उलटून तिघांचा मृत्यू

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
कोटा,
sleeper bus overturns in Kota राजस्थानमधील कोटा शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण रस्ता अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३५ जण जखमी झाले आहेत. अहमदाबाद येथून मध्य प्रदेशातील भिंड आणि मोरेना दिशेने जाणारी स्लीपर बस कोटा बायपास परिसरात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये सुमारे साठ प्रवासी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बस वेगाने धावत असताना ती अचानक मार्ग बदलत डिव्हायडरवर आदळली आणि पलटी झाली. या अपघातात घटनास्थळीच काही प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काहींना रुग्णालयात नेत असताना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये तीन पुरुषांचा समावेश असून काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
 
 
Kota
 
या दुर्घटनेत महिला, मुले आणि वृद्धांसह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाची प्रकृती गंभीर असून तो बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात घडला असावा, मात्र बसमध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यताही तपासली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक तातडीने दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सध्या पोलिसांकडून या अपघाताच्या नेमक्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे.