मुंबई,
State Health Systems Resource Centre राज्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात राज्य सरकारने नवे धोरण लागू केले असून, आता सर्व बदल्या ठरावीक निकष आणि पारदर्शक प्रक्रियेच्या आधारेच केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे आरोग्य विभागातील बदली प्रक्रियेत दीर्घकाळापासून जाणवणारी अनियमितता आणि गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री प्रा. अभिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या नव्या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले. या धोरणानुसार आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन हा बदल्यांचा मुख्य आधार असेल. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एसएचएसआरसी) यांना या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका देण्यात आली असून, जिल्हानिहाय अधिकारी व संस्थांची कामगिरी नियमितपणे तपासली जाणार आहे.
एसएचएसआरसी कडून दर State Health Systems Resource Centre महिन्याला तयार होणाऱ्या कामगिरी अहवालांच्या आधारेच पुढील बदल्या आणि पदोन्नतीचे निर्णय घेतले जातील. प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक कामगिरीचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यानुसार गुणांकन पद्धती विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे राजकीय किंवा इतर दबावाऐवजी केवळ गुणवत्तेच्या आधारावरच मानव संसाधन व्यवस्थापन होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.आरोग्य विभागातील बदल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत असून, पारदर्शकतेचा अभाव आणि अनियमित हस्तक्षेप याबाबत वारंवार तक्रारी नोंदवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर नवीन धोरणामुळे प्रशासकीय शिस्त सुधारेल आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या नव्या निर्णयाचा परिणाम ग्रामीण व शहरी आरोग्य सेवांवरही होणार असून, गुणवत्ताधारित कामकाजामुळे विभागातील कार्यक्षमता वाढेल, असेही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.