महिलांच्या योगदानाशिवाय गावाची स्वच्छता अशय : सारिका कारले

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
पाणी व स्वच्छता विषयक प्रशिक्षण संपन्न
 
वाशीम, 
Swachh Bharat Mission स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे स्वच्छ झाली परंतु ही स्वच्छता शाश्वत राहण्यासाठी महिलांचे योगदान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंगरूळनाथ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सारिका कारले- हिंगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, जानसंपर्क अधिकारी राम श्रुगारे, प्रशिक्षक विलास भालेराव, प्रभू कांबळे, प्रतीक्षा भगत, प्रवीण पट्टेबहादूर, तालुका समन्वयक प्रवीण आखाडे, अभिजित गावंडे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत मंगरुळनाथ पंचायत समितीत महिलांसाठी पाणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.सदर प्रशिक्षण कार्यक्रम १५ ते १६ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात बचत गटातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन आणि ए. एफ. सी. इंडिया लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले होते.
 

Sarika 
 
Swachh Bharat Mission  पुढे बोलतांना गटविकास अधिकारी सारिका कारले-हिंगे म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात महिला या पाणी आणि स्वच्छतेशी अधिक संबंधित असतात. कुटुंबाच्या घडणीत महिलांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे गावातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण महिलांना देणे अत्यंत आवश्यक आहे.त्यांनी पुढे सांगितले की, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना गावपातळीवर स्वच्छता टिकवून ठेवणे, कचर्‍याचे वर्गीकरण व पुनर्वापर, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्यावी याबाबत महिलांना प्रशिक्षण दिल्यास ते गावाला योग्य दिशा दाखवतील. गावाची स्वच्छता कायमस्वरूपी राखण्यासाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे असेही त्या म्हणाल्या. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे महिलांना माहिती दिली. तसेच ओडीएफ प्लस संकल्पना, प्लास्टिक मुक्त गाव, घनकचरा व द्रवकचरा व्यवस्थापन यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांच्यासह प्रवीण आखाडे, अभिजीत गावंडे यांनी परिश्रम घेतले.