नियम मोडणार्‍यावर वाहतूक पोलिसांचा दंडूका

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
- ७ महिन्यात १.१२ कोटींचा दंड वसूल
- इंटरसेप्टर वाहन व एमपीआर सीसीटीव्हीची नजर

गोंदिया, 
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत Traffic rules वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. ५ डिसेंबर २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आलेल्या इंटरसेप्टर वाहनासह एमपीआर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अवघ्या सात महिन्यांत तब्बल १ कोटी १२ लाख ९३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सप्टेंबर ते मार्च या कालावधीत एमपीआर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे १२ हजार ८७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी ५ लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर इंटरसेप्टर वाहनाने केवळ तीन महिन्यांत ४०३ वाहनचालकांवर कारवाई करत ७ लाख ५१ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
 
 
Traffic
 
Traffic rules  वेगमर्यादा ओलांडणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न वापरणे अशा विविध नियमभंगांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ओव्हरस्पीडिंग करणार्‍या वाहनांना थांबवून तात्काळ चालान दिले जाते किंवा वाहनाच्या क्रमांक प्लेटचा फोटो काढून ई-चलान जारी केला जातो. जिल्ह्यातील अनियंत्रित वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी शासनाकडे इंटरसेप्टर वाहनाची मागणी केली होती. त्यानुसार हे अत्याधुनिक वाहन जिल्हा वाहतूक शाखेत दाखल झाले आहे. त्यात उच्च तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहनात एक अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. भरधाव वाहनांवर लक्ष ठेवून तत्काळ कारवाई केली जात आहे. इंटरसेप्टर प्रणालीमुळे वाहतूक पोलिसांचे काम अधिक प्रभावी व सुलभ झाले असून नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर आता अधिक अचूकपणे नजर ठेवली जात आहे.
 
 

इंटरसेप्टर वाहनाद्वारे वाहतूक नियम मोडणार्‍यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
- नागेश भाष्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया.