- विद्यापीठात कलांचा सुरेल संगम
नागपूर,
‘Visual Symphony 2026’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर ललित कला विभागात ‘व्हिज्युअल सिंफनी २०२६’ या कला उत्सवाचा उत्साहात शुभारंभ झाला. दिनांक १६ ते १८ एप्रिलदरम्यान आयोजित या उपक्रमात विविध कलाप्रकारांचा सुरेल संगम अनुभवायला मिळत आहे. उद्घाटनप्रसंगी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे यांनी “कला ही आनंददायी संकल्पना असून ती कलाकाराला आत्मिक समाधान देते,” असे प्रतिपादन केले. कलाकाराचे जीवन संघर्षमय असले तरी कलेच्या साधनेतून त्याला समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांनीच भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. विजय खंडाळ, नाट्य-चित्रपट कलावंत जयंत गडेकर तसेच विभागप्रमुख डॉ. संयुक्ता थोरात उपस्थित होते. जयंत गडेकर यांनी कलेला वयाचे बंधन नसून प्रतिभेच्या जोरावर कलाकार आपले स्थान निर्माण करतो, असे सांगितले. डॉ. विजय खंडाळ यांनी विभागाच्या उज्ज्वल परंपरेचा उल्लेख करत नव्या पिढीतील कलावंत घडवण्याची गरज व्यक्त केली.
‘Visual Symphony 2026’ प्रास्ताविकात डॉ. संयुक्ता थोरात यांनी कला ही अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम असून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त असल्याचे नमूद केले. या उत्सवात विद्यार्थ्यांनी पेंटिंग, फोटोग्राफी, इलस्ट्रेशन यांसारख्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील डॉ. सदानंद चौधरी, डॉ. अमोल गुल्हाने, प्रा. पियुष धुमकेकर, हर्षद सालपे, समर बोबडे यांनी सहकार्य केले. उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी कथकली-भरतनाट्यम शैलीतील गणेश वंदना सादर केली. प्रदर्शन १८ एप्रिलपर्यंत खुले राहणार असून कला रसिकांसाठी आकर्षण ठरत आहे.