जलसंवर्धनासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
वाशीम, 
Water conservation पाण्याचा कार्यक्षम व नियोजित वापर ही आजच्या काळाची अत्यंत गरज असून, जलसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अहील्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६चा शुभारंभ १५ एप्रिल रोजी पाटबंधारे उप विभाग, सिव्हील लाईन, वाशीम येथे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लघु पाटबंधारे विभाग(बांधकाम) कार्यकारी अभियंता एच. डी. चव्हाण उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. पीदडी तसेच कारंजा लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. सत्तीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जलपूजन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 
 
Water
 
Water conservation  यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे म्हणाले की, या कृती पंधरवड्याच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात यावा. विभागाचे कामकाज लोकांपर्यंत पोहोचविणे, पाणी वापर संस्थांसाठी चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करणे, महिला मेळावे घेणे, अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, भूसंपादन व पुनर्वसन तसेच उपसा सिंचन परवानग्यांशी संबंधित तक्रारींचे निरसन करणे यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात यावेत.तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि गावपातळीवर शिबिरे व मार्गदर्शन यांद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा उपक्रम प्रभावीपणे पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व उपक्रमांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांनी सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंवर्धनाच्या चळवळीला गती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उप विभाग, वाशीम यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उपविभाग तसेच शाखा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.