पुनर्रचनानंतर दक्षिणेला किती जागा? अमित शाहांनी सांगितले आकडे

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
amit-shah : लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरू असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण भारतातील राज्यांबाबत मोठी माहिती दिली आहे. पुनर्रचनेमुळे दक्षिणेकडील राज्यांचे नुकसान होणार असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावत, उलट त्यांचे प्रतिनिधित्व वाढेल असा दावा केला.
 
 
 
amit-shah
 
 
अमित शाह यांनी स्पष्ट केले की, लोकसभेतील एकूण जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यानुसार सर्व राज्यांमध्ये जागांची वाढ होईल. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांचा हिस्सा कमी होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, कर्नाटकच्या जागा सध्याच्या 28 वरून 42 पर्यंत वाढू शकतात, तर तामिळनाडूच्या जागा 39 वरून 59 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे जागांची संख्या वाढेल, पण एकूण टक्केवारीत मोठा फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
विरोधकांकडून दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल असा आरोप केला जात असताना, शाह यांनी हा “गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न” असल्याचे म्हटले. सरकारचा उद्देश सर्व राज्यांना न्याय देणे आणि लोकसंख्येच्या आधारे संतुलित प्रतिनिधित्व निर्माण करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, या विधेयकामुळे देशभरात राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः दक्षिणेकडील राज्यांनी याला विरोध दर्शवला आहे. मात्र, सरकारकडून सातत्याने यावर स्पष्टीकरण देत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नसल्याचा दावा केला जात आहे.
 
एकूणच, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या दोन्ही मुद्द्यांवर संसदेत जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात या विषयावर मोठे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता आहे.